Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Aurangabad › हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही

हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही

Published On: Aug 15 2018 12:35AM | Last Updated: Aug 15 2018 12:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्ट रोजी केलेल्या आंदोलना वेळी वाळूज एमआयडीसीतील सुमारे 60 कंपन्यांवर  हल्ला केला. जमावाने घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड, जाळपोळ केली. या हल्ल्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनावर टीका झाली होती. परंतु, वास्तव दुसरेच निघाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली दुसर्‍याच असंतुष्ट समाजकंटकांनी हे कृत्य केले. या हल्ल्यामागे मराठा मोर्चाचा किंवा मराठा आंदोलकांचा हात नव्हता, असा खुलासा खुद्द पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. 

आतापर्यंतच्या पोलिस तपासात तरी या हल्ल्यात कोठेही मराठा आंदोलकांचा संबंध आढळून आलेला नाही, असे ते म्हणाले. आयुक्तांच्या या खुलाशामुळे मराठा मोर्चाला या हल्ल्याच्या माध्यमातून ‘लक्ष्य’ करणारे चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

9 ऑगस्ट रोजी औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीत दुपारपर्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू होते. दुपारनंतर मात्र अचानक जमाव हिंसक बनला. एका जमावाने एमआयडीसीत घुसून जाळपोळ आणि तोडफोड करीत धुडगूस घातला. या जमावाने एकापाठोपाठ सुमारे 70 ते 80 कंपन्यांमध्ये हल्ले करीत मोठ्या प्रमाणात जाळपोळ, तोडफोड केली. कंपन्यांचेे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. या मुद्द्यावर मराठा आंदोलनाला काही जणांनी जाणीवपूर्वक ‘लक्ष्य’ केले होते. मराठा क्रांती मोर्चाने मात्र हा हल्ला मराठा आंदोलकांनी नव्हे, तर समाजकंटकांनी केला आहे, असे सांगत या घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. 

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपासाला सुरुवात केली. हल्ला झालेल्या कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपींची धरपकड सुरू केली. आतापर्यंत या प्रकरणात 53 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यातील 20 पेक्षा अधिक हल्लेखोर हे मराठेतर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित कटाचाच भाग आहे आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून काही समाजकंटकांनी आपला उद्देश साध्य करून घेतल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भात मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी या हल्ल्यात मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा आंदोलकांचा हात असल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात कोठेच समोर आलेले नाही, असे सांगत मराठा आंदोलनाचा ‘क्लीन चिट’ दिली. 
अनेक हल्लेखोर कामगारच आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांमध्ये अनेक जण हल्ला झालेल्या कंपन्यांमधीलच हंगामी कामगार किंवा काढून टाकलेले कामगार असल्याचे समोर आले आहे. हे कामगार कंपनी व्यवस्थापनावर नाराज होते. आपला व्यक्तिगत राग त्यांनी मराठा आंदोलनाच्या नावाखाली काढला, असेही आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
सूत्रधारांचे धागेदोरे मिळाले

या हल्ल्याच्या वेळी एक बुलेटस्वार आणि स्कॉर्पिओ गाडीतून आलेले काही जण जमावाला भडकावत होते. हेच या हल्ल्याचे सूत्रधार आहेत. त्यांचे धागेदोरे मिळाले असून, लवकरच पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचतील, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही डॉ. चिरंजीव प्रसाद यांनी दिला.