Thu, Apr 25, 2019 16:16होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये 'कचर्‍या'चा भडका

औरंगाबादमध्ये 'कचर्‍या'चा भडका

Published On: Mar 08 2018 8:38AM | Last Updated: Mar 08 2018 8:38AMऔरंगाबादः प्रतिनिधी

वीस दिवसांपासून धुमसत असलेल्या कचर्‍याने बुधवारी (दि. 7) अखेर ‘पेट’ घेतला. मनपाच्या गाड्या कचरा घेऊन मिटमिट्याकडे जात असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तुफान दगडफेक करीत नागरिकांनी कचर्‍याची वाहने पेटवून दिली. हे आंदोलन इतके चिघळले की, काही वेळातच रस्त्यावरील शेकडो वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पाठविण्यात आला, परंतु जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली.

यात 15 ते 20 पोलिस जखमी झाले असून, नंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये शेकडो नागरिक जखमी झाले. मनपाचा कचरा डेपो नारेगावमध्ये होता, परंतु स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरू केल्यामुळे मागील 20 दिवसांपासून शहरात कचर्‍याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मनपा प्रशासनाने अनेक भागांत जागेचा शोध घेतला. नागरिकांचे पाय धरले, परंतु कोणीही कचरा टाकण्यास परवानगी दिलीनाही. अखेर हा प्रश्‍न हायकोर्टात गेला. कोर्टानेही नारेगावमध्ये कचरा टाकण्यास मनाई केली. त्यामुळे मनपाच्या अडचणी वाढल्या. मिटमिटा भागात शासनाने महापालिकेला सफारी पार्कसाठी शंभर एकर जागा दिली आहे.त्यापैकी पाच एकर जागेवर मनपाने कचरा टाकण्याचा निर्णय घेतला.

मात्र, स्थानिकांचा कडाडून विरोध असल्याने पोलिस बंदोबस्तात कचर्‍याच्या गाड्या तिकडे नेण्यात येत होत्या. बुधवारी दुपारी 2 वाजता 15 गाड्या सेंट्रल नाक्यावरून कचरा घेऊन निघाल्या. नगरनाकामार्गे वाहने मिटमिट्यात पोहचताच आंदोलकांनी त्यांना अडविले. सोबत पोलिस बंदोबस्त होता, परंतु नागरिकांचा तीव्र विरोध असल्याने पोलिसही काहीच करू शकले नाहीत. काही क्षणांत हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी कचर्‍याची वाहने जाळण्यास सुरुवात केली. वाहनांनी पेट घेतल्यावर जमाव सैरावैरा पळाला. दरम्यान, येथे बंदोबस्त वाढविण्यात आला. आंदोलन शांत झाल्यावर रात्री 7 वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, तोपर्यंत नाशिक, नगर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी दौलताबाद रस्त्यावर हिंसाचार सुरू झाल्यामुळेरस्त्यावंरील वाहतूक बंद करण्यात आली. रात्री 7 पर्यंत गोंधळ सुरूच राहिल्यामुळे रस्ता वाहतुकीस बंद होता. कन्नड, धुळे, चाळीसगावच्या दिशेने जाणारी वाहने फुलंब्रीच्या, तर नाशिक, दौलताबादकडे जाणारी वाहने नगर रोडच्या दिशेने वळवण्यात आली.

नागरिक-पोलिसांची एकमेकांवर दगडफेक

जवळपास तीन हजार नागरिक रस्त्यावर आले. त्यांनी पोलिस आणि कचर्‍याच्या वाहनांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. मोठाले दगड आणि विटांचा जोरदार मारा सुरू झाल्यावर पोलिस दूर पळाले. पोलिसांनीही नागरिकांच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे एका बाजूने नागरिक, तर दुसर्‍या बाजूने पोलिस दगडांचा मारा करताना दिसून आले.

अश्रुधुराची 20 नळकांडी फोडली

आंदोलक नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे पोलिस त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत. घटनास्थळी पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्‍त ज्ञानोबा मुंढे यांच्यासह सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे असा मोठा बंदोबस्त रवाना झाला. नागरिकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची20 नळकांडी फोडली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पोलिसांनी राबविले ‘कोंबिंग’

जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीत 20 पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. अखेर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून दगडफेक करणार्‍या नागरिकांची धरपकड सुरू केली. रात्री उशिरापर्यंत ही धरपकड सुरू होती. बहुतांश जखमींना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले
आहे. जखमी पोलिस अधिकारीही खासगी रुग्णालयातच उपचार घेत आहेत. अशी माहिती पोलिससूत्रांनी दिली.