Tue, Nov 20, 2018 23:29होमपेज › Aurangabad › बोंडअळीने अख्खा जिल्हा कुरतडला

बोंडअळीने अख्खा जिल्हा कुरतडला

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:42AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बोंडअळीने कापूस फस्त केल्यानंतर नुकसान भरपाईसाठी मागणी वाढली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. तब्बल दीड महिन्यात प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले असून, औरंगाबाद जिल्ह्यातील पावणेसहा लाख शेतकर्‍यांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना शासनाने जाहीर केलेले प्रतिहेक्टर 6800 रुपयांप्रमाणे मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ही मदत किती दिवसांत मिळेल, याकडे आता शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

5 डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि तांदूळ पिकांवरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचा निर्णय झाला. दहा दिवसांत पंचनामे करून 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचा व शेतकर्‍यांच्या संख्येसंदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. पंचनामे करताना नुकसानग्रस्त शेतीचे जीपीएस यंत्रणाआधारित मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने फोटो घेण्याचे बंधन होते, त्यामुळे पंचनामे करण्यास वेळ लागला. जिल्ह्याचा सविस्तर अहवाल नुकताच विभागीय आयुक्‍तांना सादर झाला आहे. 

जिल्ह्यातील 5 लाख 83 हजार 663 शेतकर्‍यांनी 4 लाख 42 हजार 96.61 हेक्टरवर कापसाची लागवड केली होती. यापैकी 4 लाख 42 हजार 969.61 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. शासनाने जिरायत शेतीसाठी शासनाने प्रति हेक्टर 6800 रुपये नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 5 लाख 74 हजार 545 शेतकर्‍यांना मदत वाटपासाठी 296 कोटी 25 लाख 8 हजार 536 रुपयांची मागणी करण्यात आली आहे.