Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Aurangabad › ‘बाबा रामदेव हेच या सरकारचे खरे लाभार्थी’

‘बाबा रामदेव हेच या सरकारचे खरे लाभार्थी’

Published On: Jan 30 2018 12:30PM | Last Updated: Jan 31 2018 2:02AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

घोषणा आणि जाहिरातबाजी करून या सरकारने अच्छे दिनचे चित्र उभे केले आहे. शेतकरी, सर्वसामान्यांना लाभार्थी असल्याचे दाखवले आहे, मात्र रामदेव बाबा हेच या सरकारचे खरे लाभार्थी आहेत. त्यांना सरकारने 600 एकर जमीन फुकटात दिली आहे. त्याचबरोबर पतंजलीची उत्पादने सरकारी दुकानांत विक्री करण्याचा फतवाही काढला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली. जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, रत्नाकर महाजन, माणिकराव ठाकरे, राजू वाघमारे, विनायकराव देशमुख, रामकृष्ण ओझा, संग्राम मुंंडे, प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्यासह नेते, पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, खोटारडे सरकार... फसवणूक दमदार... असे या सरकारबाबत म्हणता येईल. आमच्या सरकारने आधारभूत किमतीत 140 टक्के वाढ केली होती. या सरकारने मात्र दीड टक्‍का वाढ केली आहे. राज्यातील 1 हजार 300 शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. दारूची दुकाने मात्र पाहिजे तेवढी सुरू करण्याची तयारी आहे. मी लाभार्थीची जाहिरात करून श्रेय लाटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काल रात्री नांदेडहून औरंगाबादला आलो, रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. नुसते फोटो काढून, जाहिरातबाजीतून विकासाचे चित्र उभे केले आहे. 

कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे विचार घेऊन पुढची वाटचाल करावी. काँग्रेसची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवावी. 2019 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, त्यासाठी आगेकूच करा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. 

फडणवीस सरकार जनतेवर विषप्रयोग करतंय

धर्मा पाटील आत्महत्याप्रकरण अतिशय गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांकडे दाद मागूनही न्याय न मिळाल्याने शेतकर्‍याला विष घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आली, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. राज्यात बारा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून सरकारला शेतकर्‍यांबाबत संवेदनशीलता राहिलेली नाही. नोटिफाइड एरियातील खासगी जमिनी मंत्री विकत घेत असल्याचे धुळे प्रकरणानंतर समोर आले आहे. या जमिनी कोणी खरेदी केल्या, असे अनेक प्रश्‍न आहेत. या सर्व प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. 

यवतमाळमध्ये कीटकनाशके फवारताना मरण पावलेल्या शेतकर्‍यांनाही न्याय मिळाला नाही. चौकशी अहवालातून ठोस काही समोर आले नाही. सर्वांना निर्दोष ठरवणारा हा अहवाल आहे. फडणवीस सरकार जनतेवर विष प्रयोग करत आहे. राज्यात जातीयवाद वाढवण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न सुरू आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातून ते दिसून आले आहे. शिवसेनेला भाजपची गरज आहे, त्यामुळे ते पाठिंबा काढणार नाहीत. भाजपसोबत ते असेच फरपटत जातील, असा टोलाही सेनानेत्यांना लगावला. भाजप-सेनेनेच शहराची अवस्था बकाल करून टाकली आहे. गुंठेवारी, पाणी, समांतर योजना असे अनेक प्रश्‍न आहेत, असेही चव्हाण म्हणाले.