Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Aurangabad › ‘लाच दे, नाही तर नापास करू’

‘लाच दे, नाही तर नापास करू’

Published On: Jun 23 2018 8:12AM | Last Updated: Jun 23 2018 8:11AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांशी बोलून ट्रायलचे आणि कायमस्वरूपी परवान्याचे काम करून देतो. पण, जर लाच दिली नाही तर काहीही कारण काढून ट्रायलमध्ये नापास करू, अशी धमकी देऊन लाच मागणार्‍या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पकडले. आरटीओ कार्यालयाच्या परिसरातच शुक्रवारी (दि. 22) ही कारवाई केली.

शब्बीर खान सरदार खान (66, रा. जहागीरदार कॉलनी, आरटीओ कार्यालयासमोर) असे अटकेतील दलालाचे नाव आहे. तो पुना मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालवितो. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे खासगी नोकरी करतात. त्यांनी चारचाकीचा शिकाऊ परवाना काढलेला आहे. आता त्यांना कायमस्वरूपी परवाना काढायचा होता. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन अर्ज केला. 13 एप्रिल रोजी नियमाप्रमाणे शासकीय फीस भरली. 10 मे रोजी ट्रायल असल्याने ते आरटीओ कार्यालयात गेले. तेथे दलाल शब्बीर खान याने त्यांची भेट घेतली आणि म्हणाला की, मी अधिकारी, कर्मचार्‍यांना सांगून ट्रायलचे
व कायमस्वरूपी परवान्याचे काम करून देतो. पण, त्यासाठी बाराशे रुपये लाच द्यावी लागेल. पैसे दिले नाही तर काहीही कारण काढून ट्रायलमध्ये नापास केले जाईल. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार, लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात बाराशे रुपये लाचेची मागणी करून नऊशे रुपयांवर तडजोड झाली. ठरल्याप्रमाणे 22 जून रोजी एसीबीचे उपअधीक्षक नितीन देशमुख, निरीक्षक शेगोकार, पोलिस नाईक अश्‍वलिंग होनराव, दिगंबर पाठक, संतोष जोशी, मिलिंद इप्पर, चिंचोले यांनी सापळा रचला. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपये घेऊन 100 रुपये परत केल्यावर पथकाने छापा मारून शब्बीर खान याला पकडले.