Sun, Apr 21, 2019 02:11होमपेज › Aurangabad › अंबाजोगाई जिल्हानिर्मितीसाठी आंदोलनाचा रेटा हवा

अंबाजोगाई जिल्हानिर्मितीसाठी आंदोलनाचा रेटा हवा

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 05 2018 11:15PMअंबासाखर : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्याच्या महसूल मंत्र्यानी अनेक जिल्ह्यांच्या विभाजनासोबत नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा विचार होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य केले होते. यामुळे अंबाजोगाईकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. हा प्रश्‍न ऐरणीवर आणण्यासठी सर्वपक्षीय आंदोलनासह लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज आहे.

अंबाजोगाई जिल्हा व्हावा ही मागणी पंचवीस वर्षांची जुनी असली तरी सरकार दरबारी मागणी पदरात पाडून घेण्यासाठी राज्यकर्त्यामध्ये जी ताकद हवी होती ती नसल्याने अंबाजोगाईच्या मागणीच्या नंतर जालना, हिंगोली, पालघर अशी तीन जिल्हे राज्यात निर्माण झाले. या भागाचे नेतृत्व करणार्‍या स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांनी या मागणीसाठी प्रसंगी पक्षनेतृत्वाशी संघर्ष केला. 

जिल्हा निर्मिती करण्यात त्यांना यश आले नसले तरी भविष्यात जेव्हा-केव्हा शासनाला जिल्हा निर्मिती करावयाची झाल्यास अंबाजोगाई जिल्हा निर्मिती केल्याशिवाय आयुक्तालयाचा निर्णय करता येणार नाही. कारण जिल्हा निर्मितीसाठी लागणारी सर्वच विभागाची अतिरिक्त कार्यालये आज अंबाजोगाईमध्ये कार्यान्वित झालेली आहेत, त्यामुळे गुणवत्तेच्या धर्तीवर कोणालाही अंबाजोगाईकरांच्या मागणीला टाळता येणार नाही. 

अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करताना बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश करायचा तसेच लातूर जिल्ह्यातील एखादा तालुका समावेशित  करावा लागतो का, याबाबतची चाचपणीही प्रशासकीय अधिकार्‍यांकडून केली जायला हवी. त्या दिशेने राजकीय नेत्यांनी तालुक्यातील तज्ञ मंडळींना सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.