Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Aurangabad › आरक्षणासाठी धनगर समाजाची निदर्शने 

आरक्षणासाठी धनगर समाजाची निदर्शने 

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 1:06AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

धनगर समाज संघर्ष समितीतर्फे, हर्सूल-जळगाव राज्य महामार्गावर विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. या वेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव रस्त्यावर आले होते.
राज्य शासनाने धनगर आणि धनगड एकच जात आहे, अशी शिफारस केंद्र शासनाकडे त्वरित पाठवावी. संविधानात दिलेल्या कलम 36 नुसार एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी केंद्र सरकाने तत्काळ करावी. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. मेंढपाळांना वनक्षेत्रात चराईची परवानगी द्यावी. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, या मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.

हर्सूलमध्ये रास्ता रोको   

औरंगाबाद ः हर्सूल परिसरात सकाळी दहा वाजता आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. त्यामुळे एक तास संपूर्ण जळगाव रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी तेथे येऊन आंदोलकांना रोखले. सहायक पोलिस आयुक्‍त सावंत, हर्सूलचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी निवेदन स्वीकारून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन घेतले. यावेळी संघर्ष समितीचे समन्वयक रंगनाथ राठोड, डॉ. भरतकुमार हरणे, नारायण सुरे, संजय हरणे, संतोष सुरे, माधव वाणी, साईनाथ हरणे, किरण सुरे उपस्थित होते.

सातार्‍यात तीव्र निदर्शने, वाहन रॅली  

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सातारा गावात तीव्र निदर्शने करण्यात आली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यात आले. सातार्‍यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सकाळी दहा वाजता खंडोबाचे दर्शन घेऊन, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. वेशीवर एकत्र येऊन नागरिकांनी सरकारविरोधात घोषणा देत तीव्र निषेध व्यक्‍त केला. त्यानंतर सातारा गावापासून बीड बायपास, रेल्वेस्टेशनमार्गे कोकणवाडीपर्यंत वाहनरॅली काढण्यात आली. कोकणवाडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. याठिकाणी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या. सरकारविरोधात घोषणा देत समाजबांधवांनी निदर्शने केली.  

पैठण लिंकरोड रास्ता रोको 

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी कांचनवाडी-नक्षत्रवाडी परिसरातील सकल धनगर समाजबांधवांनी पैठण लिंकरोड चौकात रास्ता रोको केला. तब्बल दोन तास आंदोलकांनी ठिय्या दिल्याने पैठण रस्त्यावर वाहहतुकीची कोंडी झाली. ‘आरक्षण आमच्या हक्काचं’, ‘धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा’ आदी मागण्या करीत आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. भाजप सरकारचा निषेध व्यक्‍त केला. सकाळी 9 वाजता पैठण-वाळूज लिंकरोडच्या चौकातच आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. 

नऊ ते अकरा वाजेपर्यंत या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली होती. घटनास्थळावर सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रमोरे, पोलिस उपनिरीक्षकांसह कर्मचार्‍यांनी रास्ता रोको न करण्याची विनंती केली.

पडेगावात धनगर आंदोलन शांततेत

पडेगाव : धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने पडेगाव येथे सोमवारी (दि. 13)  सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. डफ वाजवून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. किमान एक तास औरंगाबाद-नाशिक महामार्ग आंदोलनकर्त्यांनी अडवून धरला होता. त्यामुळे चाकरमनी, व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थ्यांचे हाल झाले. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. 
छावणी पोलिस विभागाचे सहायक आयुक्‍त ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, छावणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक  श्रीपाद परोपकारी, पोलिस उपनिरीक्षक सचिन मिरधे व दंगा काबू पथकाचे एक तुकडी यांनी चोखबंदोबस्त ठेवला होता. निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको हटवण्यात आला. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगरसेवक रावसाहेब आम्ले, हिरालाल वाणी, अरुण रोडगे, भारत वाणी, प्रकाश दुबिले, कैलास वाणी, अंबादास म्हस्के, मच्छिंद्र वाणी, हरीश दुबिले, कल्याण तौर, पप्पू आढाव, सुशील वाणी, तुषार वाणी, सुनील दुबिले, नारायण दुबिले, वैजिनाथ पाल्हाळ आदींची  उपस्थिती होती.