होमपेज › Aurangabad › कर्मचार्‍यांच्या पगारात पडणार दोन ते आठ हजारांचा फरक

कर्मचार्‍यांच्या पगारात पडणार दोन ते आठ हजारांचा फरक

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMऔरंगाबाद : रवी माताडे

सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी मंगळवारपासून (दि. 7) तीन दिवसीय संप सुरू केला आहे. वेतन आयोग लागू केल्यानंतर सरकारी कर्मचार्‍यांच्या हातात बक्कळ पैसा येईल, महागाईत वाढ होईल, रिअल इस्टेट व बाजारपेठेतील मंदी दूर होईल, अशी चर्चा आता सर्वसामान्यांच्या तोंडी आहे. तर गेल्या दहा-बारा वर्षांतील महागाई वाढीच्या अनुषंगानेच वेतन आयोग दिला जातो. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरासरी दहा ते पंधरा टक्के वाढ होईल. 

शिपायांच्या पगारात दरमहा 2 ते 3 हजार, तर अधिकार्‍यांच्या पगारात 7 ते 15 हजारांची वाढ होईल, असे सांगण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी सहावा वेतन आयोग लागू झाला होता. त्यानंतर सरकारी कर्मचार्‍यांच्या हातात थकबाकीपोटी मोठी रक्कम पडली. ही रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवली गेली. त्यामुळे प्लॉट, फ्लॅटच्या किमती आकाशाला भिडल्या. महागाईतही मोठी वाढ झाली. खासगी क्षेत्रात काम करणार्‍या सर्वसामान्यांना त्यांची मोठी झळ सोसावी लागली. 

अशीच परिस्थिती सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर होईल, अशी चर्चा होत आहे. तर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी व नेत्यांनी मात्र हे सर्व दावे व चर्चा फोल असल्याचे म्हटले आहे. मुळातच सरकारी कर्मचार्‍यांना पगार कमी आहे. सरकारी कार्यालयातील शिपाई 14 ते 20 हजार आणि कर्मचार्‍याला 16 ते 35 हजारांपर्यंत पगार मिळतो. आज खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे पगार 40-50 हजारांच्या घरात गेले आहेत. त्या तुलनेत सरकारी कर्मचार्‍यांचा पगार कमी असल्याने वेतन आयोग लागू करण्याची मागणी योग्य असल्याचा दावा केला जात आहे.