Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Aurangabad › पोलिसांच्या मध्यस्थीने असा ही एक विवाह!

पोलिसांच्या मध्यस्थीने असा ही एक विवाह!

Published On: Feb 05 2018 1:07PM | Last Updated: Feb 05 2018 1:16PMपिशोर : किशोर जाधव

तीन वर्षांपूर्वीपासून चालू असलेल्या प्रेमीयुगुलाच्या प्रेमकथेचे रुपांतर अखेर पिशोर पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीने लग्नात झाले. मुलीच्या भावाचा या लग्नाला विरोध असतानाही पोलिस व गावकर्‍यांनी मुलीच्या घरच्या लोकांची समजूत घातल्याने या दोघांचा  आगळा वेगळा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने हजारो लोकांच्या साक्षीने एका मंदिरात पार पडला.

याबाबत अधिक माहिती अशी, कन्नड तालुक्यातील पिशोर येथील एका रुग्णालयात कामास असलेल्या सचिन उखर्डे आणि  गावातीलच ज्योती नवले यांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. लग्न करण्याच्या आणाभाकाही त्यांनी घेतल्या होत्या. एवढेच नाही  तर सचिनने रितसर ज्योती सोबत लग्नकरण्यासंबधी तिच्या आई वडिलांकडे मागणीही घातली होती, परंतु मुलीच्या भावाने त्यांच्या विवाहाला विरोध केला होता. दरम्यान, ज्योतीला  बघण्यासाठी इतर गावावरून मुले येऊ लागल्यामुळे रविवारी (दि.4 )  सायंकाळी ज्योतीने सचिनला घेऊन पिशोर पोलिस ठाणे गाठून आपली प्रेमकथा सांगितली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे, पोलिस उपनिरीक्षक जयराज भटकर व कर्मचार्‍यांनी दोघांकडच्या घरच्यांना व गावातील प्रतिष्ठित  नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून या दोघांच्या विवाहाबाबत समजावून सांगितले. 

दोघेही सज्ञान असल्याने कायद्याने दोघेही आपला जोडीदार निवडू शकतात, असे मोरे यांनी पटवून दिले. तसेच पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा ठरवून लग्न करणे  योग्य राहील, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. गावकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दोन्ही बाजूची मंडळी या लग्नास तयार झाली. यानंतर पोलिस ठाण्यातच नवरदेव आणि नवरी यांना विवाहाचे कपडे व इतर साहित्य देऊन वाजत गाजत दिगर परिसरातील संत ज्ञानेश्‍वर मंदिरासमोर विवाह  समारंभ पार पडला. या वेळी गावातील हजारो ग्रामस्थांनी या आगळ्या वेगळ्या विवाह समारंभाला हजेरी लावली. या विवाहासाठी योग्य मध्यस्थी केल्याबद्दल आणि तत्काळ तणाव निवाळल्याबद्दल पिशोर पोलिस ठाण्याचे स्वागत होत आहे.