Tue, Apr 23, 2019 02:20होमपेज › Aurangabad › बाबासाहेबांना ‘महाराज’ बिरूद; कुलसचिवांचे निलंबन

बाबासाहेबांना ‘महाराज’ बिरूद; कुलसचिवांचे निलंबन

Published On: Jun 16 2018 8:38AM | Last Updated: Jun 16 2018 8:37AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराज असा उल्लेख केल्यामुळे अधिसभा बैठकीत शुक्रवारी (दि. 15) महाभारत घडले. महाराज बिरूद लावून बाबासाहेबांचे भगवीकरण करण्यात येत असल्याचा आरोप करून अधिसभा सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कुलगुरूंनी पांडे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली. तथापि, नंतर त्यांना परत बोलावून निवडणुकीचे पुढील सोपस्कार पूर्ण करण्यात आले. सायंकाळी कुलगुरूंनी मंच आणि स्वाभिमानी मुप्टाच्या शिष्टमंडळांशी बोलताना ती तात्पुरती कार्यवाही होती, असे सांगितले. दुसरीकडे उत्कर्षने निलंबन तात्पुरते कुठे असते, असा सवाल करत निलंबनाबाबत मागेपुढे झाले तर उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे पांडे यांच्या निलंबनाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. 

व्यवस्थापन परिषद निवडणुकीसाठी आज (दि. 15) अधिसभेची बैठक बोलावण्यात आली होती. महात्मा फुले सभागृहात सकाळी बैठकीला प्रारंभ झाला. डॉ. पांडे यांनी महापुरुषांचे स्मरण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर ओघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराज असा उल्लेख केला. त्यांच्या तोंडून बाबासाहेबांचा महाराज असा उल्लेख होताच उत्कर्षचे अधिसभा सदस्य प्रा. सुनील मगरे उठून उभे राहिले. डॉ. पांडे यांनी बाबासाहेबांचा चुकीचा उल्लेख केला आहे. हा बाबासाहेबांच्या भगवीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप करत त्यांनी व इतर सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. त्यांनी डॉ. पांडे यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. सर्वांनी मंजूर मंजूरचा गलका केल्यानंतर कुलगुरूंनी पांडे यांना निलंबित करण्यात येत असल्याचे सांगितले. पांडे सभागृहातून निघून गेल्या. तथापि, विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांनी डॉ. पांडे मतदार तसेच निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे त्यांना परत बोलावण्याची मागणी रेटली. मंचचे डॉ. भगवानसिंह डोभाळ आणि इतरांनी कायद्याचा हवाला देऊन अधिसभेला निलंबनाची कार्यवाही करता येत नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा कुलगुरूंनी पांडे यांना सन्मानपूर्वक पाचारण केले आणि डॉ. पांडे यांच्या देखरेखीखाली मतदानाची पुढील प्रक्रिया पार पडली. त्यांच्याच हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. दरम्यान, कुलगुरूंनी डॉ. पांडे पदावर कायम राहतील, निलंबन तात्पुरते होते, असे सायंकाळी स्पष्ट केल्याचे स्वाभिमानी मुप्टा आणि मंचच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. तथापि, कुलगुरूंशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

मंचचेही निवेदन

अधिसभा बैठकीत डॉ. पांडे यांच्या निलंबनाचा घेण्यात आलेला तोंडी ठराव बेकायदेशीर आहे. त्युळे तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांनी कुलगुरूंना दिले. या निवेदनावर डोभाळ यांच्यासह डॉ. गोविंद काळे, हरिदास विधाते, संजय निंबाळकर, डॉ. योगिता पाटील आदींच्या सह्या आहेत. 

मगरेंवर कारवाईची मागणी

बाबासाहेबांना महाराज हे बिरूद लावण्यात गैर काय, असा सवाल करत स्वाभिमानी मुप्टा संघटनेने डॉ. पांडे यांची पाठराखण केली. डॉ. पांडे यांनी मानवता के महाराजा डॉ. आंबेडकर असा शब्दप्रयोग आदरयुक्‍त भावनेने केला आहे. मात्र, मगरे राजकीय हेतूने बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून पांडे यांना त्रास देत आहेत. विद्यापीठ कायद्याच्या कलम 29 (अ) नुसार अशा प्रकारचा निलंबनाचा ठराव अधिसभेला करता येत नाही. हा ठराव नियमबाह्य असून तो रद्द करावा, असे संघटनेने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे आदींच्या सह्या आहेत.