Sun, May 26, 2019 19:34होमपेज › Aurangabad › ‘ईद के लिए पैसे दे’ म्हणत कुर्‍हाडीने मारणारा अटकेत

‘ईद के लिए पैसे दे’ म्हणत कुर्‍हाडीने मारणारा अटकेत

Published On: May 29 2018 1:44AM | Last Updated: May 29 2018 12:24AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

उस्मानपुर्‍यातील चौसर चौकात वाळूच्या ढिगार्‍यावर मोबाइलमध्ये गेम खेळत बसलेल्या तीन तरुणांकडे ‘ईद के लिए पैसे दे’ असे म्हणून कुर्‍हाडीने हल्ला करणार्‍या चौघांपैकी एकाला अटक करण्यात आली. उस्मानपुरा पोलिसांनी सोमवारी (दि. 28) ही कारवाई केली.

शेख अब्दुल शेख अन्वर (रा. शहानूरवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, शेख मोहसीन ऊर्फ शाहनूर शेख अन्वर (रा. शहानूरवाडी) याच्यासह अन्य दोघे पसार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख नवीद शेख कय्युम (30, रा. ललित कला भवनजवळ, उस्मानपुरा), इम्रान खान झाकीर खान (रा. शहा कॉलनी) आणि मोहंमद सिराज मोहंमद इद्रीस (रा. शहानूरवाडी) हे तिघे 26 मे रोजी रात्री 9 वाजता चौसर चौकातील बशीर भाईच्या टपरीच्या बाजूला असलेल्या वाळूच्या ढिगार्‍यावर मोबाइलमध्ये गेम खेळत बसले होते. तेथे आरोपी शेख अब्दुल शेख अन्वर, शेख मोहसीन ऊर्फ शाहनूर शेख अन्वर आणि आणखी अनोळखी दोघे असे चौघे आले. त्यांनी शेख नवीदकडे ‘ईद के लिए पैसे दे’ म्हणत पैशांची मागणी केली. त्यावर नवीदने नंतर देतो, असे सांगितले.

तेवढ्यात नवीदच्या मित्राने ‘काय के पैसे’ म्हणून विचारताच आरोपींनी शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. शेख अब्दुल याने नवीदच्या डोक्यात उलटी कुर्‍हाड मारून त्याचे डोके फोडले. या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे, सहायक फौजदार कल्याण शेळके, पोलिस नाईक प्रल्हाद ठोंबरे, मनोज बनसोडे, संतोष सिरसाठ आदी कर्मचार्‍यांनी शेख अब्दुल शेख अन्वर याला अटक केली.