Wed, May 22, 2019 07:24होमपेज › Aurangabad › गुप्ती घुसली आशिषच्या पोटात

गुप्ती घुसली आशिषच्या पोटात

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 1:06AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आशिष साळवेच्या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या कुणाल गौतम जाधव (20) व अविनाश गौतम जाधव (22, दोघे रा. गल्ली नं. 3, रमानगर) यांना न्यायालयाने दहा दिवसांची (26 एप्रिलपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, क्रांती चौक पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला असून आशिष तर आमचा चांगला मित्र होता. त्याच्याशी आमचा काहीही वाद नव्हता. आमचे टार्गेट राहुल जाधव होता. त्याला स्टेजवर पकडल्यानंतर आम्ही वार करणार तोच त्याचा फेटा निसटला. त्यामुळे वार आशिषच्या पोटात घुसला, अशी माहिती ते पोलिसांना देत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मान्यवरांच्या स्वागतासाठी रमानगर येथील रविराज मित्रमंडळातर्फे क्रांती चौकात स्टेज उभारण्यात आले होते. या स्टेजवर राहुल जाधवसह आशिष साळवे व त्यांचे मित्र मान्यवरांचे स्वागत करीत होते. 14 एप्रिल रोजी रात्री साडेदहा ते पावणेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी अविनाश आणि कुणाल स्टेजवर आले. राहुलचा काटा काढायचाच या इराद्याने अविनाशने त्याच्या मानेवर हात टाकला. अविनाश गुप्तीने वार करणार तोच त्याच्या हातात राहुलचा फेटा आला. फेटा निसटल्याने राहुल डगमगला. त्याने बाजूला उभा असलेल्या आशिष साळवेचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. तोच अविनाशचा वार आशिषच्या पोटात घुसला. त्यानंतर अविनाश आणि कुणाल यांनी गर्दीतून पोबारा केला. 

Tags : Aurangabad, accidental, murder