Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Aurangabad › अपघातात दोन मित्र ठार

अपघातात दोन मित्र ठार

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 08 2018 1:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आपल्या जीवलग मित्राला कामाच्या ठिकाणाहून घराकडे घेऊन येत असताना अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. मृत्यूचा सापळा समजल्या जाणार्‍या पडेगाव रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनी ऊर्फ शुभम रमेश राऊत (वय 22, रा. न्यू नंदनवन कॉलनी), राधे ऊर्फ श्रीकांत शिवाजी हिवाळे (वय 24, रा. पडेगाव) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. आकाश रमेश सोनवणे (वय 23, रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आकाश सोनवणे हा भांगसीमाता रस्त्यावरील एका पेट्रोेलपंपावर कामाला आहे. मंगळवारी शुभम, श्रीकांत व त्याने रात्री पार्टी करण्याचा बेत आखला होता. त्यानुसार शुभम व श्रीकांत हे दोघे दुचाकी (एमएच 20 एक्यू 2459) घेऊन रात्री अकरा वाजेच्या सुमारास आकाशकडे गेले होते. आकाशचे काम संपल्यावर तिघांनी पार्टी केली. दुचाकीवर बसून तिघे मित्र मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास परत येत असताना दौलताबाद रस्त्यावरील पडेगावजवळ असलेल्या पठाण ढाब्यासमोर समोरून येणार्‍या एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे आकाश हा हवेत उडून लांब जाऊन पडला. तर शुभम आणि श्रीकांत हे त्या वाहनासोबत काही अंतरापर्यंत घसरत गेले. त्यामुळे तिघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेले होते. येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांच्या लक्षात ही घटना आल्याने त्यांनी छावणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांना गंभीर जखमी अवस्थेत घाटीत आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून श्रीकांत व शुभम यांना मृत घोषित केले, तर आकाशची प्रकृती देखील चिंताजनक आहे.