Tue, Jul 07, 2020 11:22होमपेज › Aurangabad › पडेगाव रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

पडेगाव रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

Published On: Feb 08 2018 1:53AM | Last Updated: Feb 08 2018 1:45AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पडेगाव रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री अपघातात ठार व जखमी झालेले तिघे जिवलग मित्र हे त्यांच्या आईवडिलांना एकुलते एक मुले आहेत. 38 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या गुळगुळीत रस्त्यावर दुभाजकच नसल्याने अशा अनेकांवर जीव गमावण्याची वेळ येत आहे.

पडेगाव रस्ता हा पूर्वीपासूनच अपघातांच्या बाबत कुख्यात आहे. पूर्वी या रस्त्यावर खड्डे असल्याने सतत अपघात होत होते. त्यामध्ये देखील अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर दीड वर्षापूर्वी सरकारने नगरनाका ते वेरूळपर्यंत नवीन रस्ता तयार करण्यासाठी 38 कोटी रुपये मंजूर केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या निधीतून वेरूळपर्यंत एकदम गुळगुळीत रस्ता तयार केला. ही बाब नागरिक व वाहनधारकांसाठी चांगली झाली. मात्र नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंत रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर किंवा रबर स्ट्रिप बसविले नाही. त्यामुळे हा रस्ता तयार झाल्यापासूनच अपघात होण्यास सुरुवात झाली होती. ही बाब लक्षात घेऊन लष्कराने व या भागाचे शिवसेना नगरसेवक रावसाहेब आमले यांनी बांधकाम विभागाकडे डिव्हायडर व रबर स्ट्रिप बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार लष्कराच्या स्टेशन मुख्यालयासमोरील रस्त्यावर व पडेगाव ते मिटमिटा दरम्यान असलेल्या तीन शाळांसमोरील रस्त्यावर रबर स्ट्रिप बसविण्यात आले आहे. मात्र दुभाजकच नसल्याने भरधाव वाहन एकमेकांना धडकून सतत अपघात घडत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये दुचाकीस्वारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

तिघे मित्र एकुलते एक

मंगळवारी मध्यरात्री अपघातात ठार झालेले श्रीकांत, शुभम व जखमी आकाश हे त्यांच्या पालकांचे एकुलते एक मुले आहेत. श्रीकांत हा घरात एकमेव कमविणारा मुलगा होता. तीन महिन्यांपूर्वी त्याच्या बहिणीचे आजारपणाने निधन झाले आहे. तिच्या उपचारासाठी सर्व मित्रांनी वर्गणी जमा केली होती. आता मुलाचाही मृत्यू झाल्याने आई निराधार झाली आहे. बुधवारी देखील त्याच्या मित्रांनी वर्गणी गोळा केली, तसेच त्याच्या मालकांनाही मदत करण्याची विनंती केली असता त्यांनीही मान्य केल्याचे एका मित्राने सांगितले. तर शुभमला आई व तीन बहिणी आहेत. तर त्याची आई ही कपडे इस्त्री करण्याचे काम करते. तसेच आकाश हा देखील त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे.