Wed, Jan 23, 2019 17:23होमपेज › Aurangabad › लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या गाडीला अपघात, नवरदेवासह एकाचा मृत्यू

लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या गाडीला अपघात, नवरदेवासह एकाचा मृत्यू

Published On: May 09 2018 9:09AM | Last Updated: May 09 2018 9:12AMपाचोड : एजाज पठाण 

पंढरपूरहून देवदर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या नवरदेवाच्या बोलेरे कार(क्र. एम.एच. २१ बी.एफ. १३९४) ला बीडकडे दुध घेऊन जाणाऱ्या टेम्पो (क्र. एम.एच.२० इ. जी.४३०२) ने धडक दिल्याने नवरदेवासह त्याची बहीण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा (ता. पैठण) जवळ बुधवारी (दि.९) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. 

खेडगाव ता. अंबड ( जि. जालना) येथील गोडसे कुटुंबातील अमीत शंकर गोडसे (वय २२) याचा शुक्रवारी (दि. ४) रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर नवदांपत्य अमित गोडसे (नवरदेव), आश्विनी अमित गोडसे (वय२१), नवरदेवाची बहीण वंदना शिवाजी चौधरी ( वय 30 वर्ष), मेहुणा शिवाजी नारायण चौधरी (वय 3५) दोघे रा.चिकनगाव (ता.जि.जालना), ज्योत्स्ना जनार्धन गोर्डे (वय २१),रा. खेडगाव (ता. अंबड) हे  लग्नानंतर देवदर्शनासाठी पंढरपूर, तुळजापूर आदी ठिकाणी गेले होते. 

देवदर्शनानंतर ते रात्री गावांकडे निघाले असता बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाचोड (ता. पैठण) जवळ येताच औरंगाबादहून लताई दुध डेअरीचा टेम्पो हा सुंदरम् जिनिंग प्रेसिंगजवळ अचानक समोर आला व यात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन बोलेरो कारचा पूर्णत: चुराडा झाला. 

बोलेरो मधील अमित शंकर गोडसे (नवरदेव,वय २२), नवरदेवाची बहीण वंदना शिवाजी चौधरी ( वय 30 वर्ष) हे दोघे जागीच ठार झाले तर नवरी -आश्विनी अमित गोडसे (वय २१) सह मेहुणा -शिवाजी नारायण चौधरी (वय 3५)  ज्योत्स्ना जनार्धन गोर्डे (वय २१),  हे गंभीर जखमी झाले. टेंपो मधील मच्छिंद्र साहेबराव कुंवरे ( वय २७  रा. गेवराई कुबेर ता. जि. औरंगाबाद), निलेशकुमार, सुरेश कुमार(वय २३),  शिवकुमार, ओमप्रकाश(वय २४ रा. अंबाला, हरियाणा) हे ही जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक महेश आंधळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ, उपस्थितांच्या मदतीने सर्वांना उपचारासाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून वधु आश्विनी अमित गोडसे हिचे पाय मोडले असून प्रकृती चिंताजनक असल्याने तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचोड व गोंदी पोलिस सयुंक्तरित्या करत आहेत.   
 

Tags : accident, Aurangabad beed road, groom, death ,Bride, four injured