Sun, Mar 24, 2019 17:05होमपेज › Aurangabad › ’तोंड उघडले तर अडचणी वाढतील’

’तोंड उघडले तर अडचणी वाढतील’

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 03 2018 1:30AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या अधिग्रहित विहिरींची बिले निघालेली नसताना सीईओ आर्दड यांनी टँकर ठेकेदारांची बिले मंजूर करण्यात एवढा रस का घेतला, याबाबत आर्थिक देवाणघेवाण झाली, असा स्पष्ट आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करून संचिकेचा प्रवास कसा झाला याचे सविस्तर स्पष्टीकरण द्या असे सदस्यांनी कॅफो जे. बी. चव्हाण यांना म्हटले. त्यावर सर्वच गोष्टी बोलायच्या नसतात. मी तोंड उघडले तर सर्वांच्याच अडचणी वाढतील असे मार्मिक उत्तर देऊन प्रशासनात म्हणावे तेवढे आलबेल नसल्याचे कॅफो चव्हाण यांनी स्पष्ट संकेत दिले.

एमआरईजीएस व पाणीटंचाईवर शुक्रवारी (दि. 2) जिल्हा परिषदेची विशेष स्थायी समिती बैठक पार पडली. यावेळी जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, बांधकाम सभापती विलासबापू भुमरे, यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते. सुरुवातीलाच अविनाश गलांडे, किशोर बलांडे, किशोर पवार, रमेश बोरनारे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे आदींनी प्रशासनाची अक्षरशः कोंडी केली. या सर्वपक्षीय सदस्यांनी सुरुवातीपासूनच सीइओ आर्दड यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी गाजलेले टँकर ठेकेदारांच्या बिलांची संचिकेवर या बैठकीतही वादळी चर्चा झाली. सीईओंनी यात आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला. आलेल्या निधीपैकी प्रथम शेतकर्‍यांच्या अधिग्रहित विहिरींची बिले देण्याचा ठराव असताना प्रथम टँकर ठेकेदारांची बिले कशी मंजूर झाली, असे म्हणून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सदर संचिकेचा प्रवास कसा झाला हे मनापासून सांगा असे सदस्य जेव्हा कॅफो जे. बी. चव्हाण यांना म्हणाले, तेव्हा त्यांनी हसून मी सर्वच स्पष्ट सांगू शकत नाही. मर्यादा आहेत. जर सांगितलेच तर सर्वच जण अडचणीत येतील. त्यांच्या या वाक्याने नंतर हा विषय थांबला.