Thu, Aug 22, 2019 14:33होमपेज › Aurangabad › जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी लाचेच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी लाचेच्या जाळ्यात

Published On: May 16 2019 2:03AM | Last Updated: May 15 2019 7:14PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

बेचाळीस दिवसांची अर्जीत रजा मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या लिपिकासह जिल्हा समाजकल्याण अधिकारी महिलेला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा परिषदेत बुधवारी (दि. 15) ही कारवाई केली.

जिल्हा समाजकल्याण अधिकारी मीना अशोक अंबाडेकर (वय ४५) आणि लिपिक हनीफ इब्राहीम शेख (वय ४८) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार हे शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र येथे नोकरीस आहेत. त्यांनी ५ ते १३ डिसेंबर २०१८ आणि १६ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान ४२ दिवसांची अर्जीत रजा घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये रजा मंजुरीचा प्रस्ताव सादर केला. पण मे महिला उजाडला तरी प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे १३ मे रोजी त्यांनी तक्रारदाराने जिल्हा समाजकल्याण अधिकारी मीना अंबाडेकर यांची भेट घेतली. तेव्हा अंबाडेकर यांनी रजा मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपये खर्च येईल, असे सांगून त्यांच्याकडे लाचेची मागणी केली. 

पण तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी १४ मे रोजी एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा अंबाडेकर यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून रक्‍कम लिपिक हनीफ शेख याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. 

१५ मे रोजी एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस नाईक अश्‍वलिंग होनराव, भिमराज जीवडे, कल्याण सुरासे, दिगंबर पाठक, बाळासाहेब राठोड, पुष्पा दराडे, संदीप चिंचोले यांनी सापळा रचला. लिपिक हनीफ शेख याने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि रक्‍कम अंबाडेकर यांच्याकडे दिली. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.