Fri, Nov 16, 2018 06:35



होमपेज › Aurangabad › ‘तो’ झोपला रेल्वे रुळावर

‘तो’ झोपला रेल्वे रुळावर

Published On: Jan 20 2018 2:04AM | Last Updated: Jan 20 2018 1:51AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

स्थळ... संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील जुने रेल्वे गेट... वेळ गुरुवारी रात्री 10.50 वाजताची... अजिंठा एक्स्प्रेस हैदराबादला जाण्याची वेळ झाली होती... लघुशंकेसाठी म्हणून रुळाकडे गेलेले विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांना चक्‍क रेल्वे रुळावर तरुण झोपलेला दिसला... त्यांनी तरुणाला समजावून बाजूला येण्याचे सांगितले... पण, तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.. अखेर रेल्वे 200 फुटांवर आल्यावर विशेष पोलिस अधिकार्‍यांनी तरुणाला उचलून रेल्वे रुळावरून बाजूला केले आणि त्याचा जीव वाचविला.

याबाबत श्रीमंत गोर्डे पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादासाहेब (नाव बदललेले आहे) हा 22 वर्षीय तरुण हायकोर्ट कॉलनीत राहतो. 11 वर्षांचा असताना इमारतीवरून पडल्याने त्याचा एक पाय मोडलेला आहे. त्याने काही दिवस खासगी शिकवणीवर हाऊस कीपिंगचे काम केले. तसेच स्कूल बसवर क्‍लिनर म्हणून त्याने काम पाहिले आहे. मात्र, कामात सातत्य ठेवत नसल्यामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे दादासाहेब याने हॉटेलमध्येही काम केले. मात्र, सध्या तो काहीही काम करीत नव्हता. आई-वडील त्याला काही तरी काम करावे म्हणून सतत टोमणे मारत होते. यावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचा. 

दरम्यान, गुरुवारी रात्रीही त्याचे आई-वडिलांसोबत भांडण झाले. त्याला वडिलांनी मारहाण केली. याचाच मनात राग ठेवून त्याने दारू पिऊन वडिलांसोबत परत भांडण केले व स्वतः जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील दोन युवकांनी त्याला रोखले होते. परंतु, तो नंतर संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ येऊन रेल्वे पटरीवर झोपला होता. हा प्रकार पाहिल्यावर विशेष पोलिस अधिकारी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला की, ‘आज कोणत्याही परिस्थितीत मला जीव  द्यायचाच आहे. माझ्या जीवनाचा कचरा झालाय. मी काहीही करू शकत नाही. मला सोडा, आज नाही तर पुन्हा कधी तरी जीव देईनच.’ तो काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने विशेष पोलिस अधिकारी अ‍ॅड. रामदास भोसले, स्वराज गोर्डे पाटील, वेदांत जोशी, अर्जुन झुंबड, रोणीत वाघ, ज्ञानेश्वर मते व डॉ. संदीप सुक्रे यांनी त्याला उचलून बाजूला नेले. त्यानंतर दादासाहेबला पोलिस उपनिरीक्षक चेतन ओगले, ठाणे अंमलदार केशव काकडे, एस. ए. नलावडे, यांनी त्याला व वडिलांना समजावून सांगितले व त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

200 फुटांवर आली होती रेल्वे
दादासाहेब (नाव बदललेले आहे) रेल्वे रुळावर झोपला असताना रेल्वेगाडी 200 फुटांवर आली होती. रेल्वे रुळावर गर्दी दिसल्याने रेल्वे इंजिन ड्रायव्हरने हॉर्न दिला. हॉर्नच्या आणि इंजिनच्या धडधड आवाजाने मदत करणार्‍यांच्या काळजात धडकी भरली. शेवटी क्षणाचा  विलंब न करता विशेष पोलिस अधिकार्‍यांनी दादासाहेबचे हातपाय धरून पटरीवरून दूर केले.

यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न
दादासाहेबने (नाव बदललेले आहे) यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कामाची धरसोड केल्यामुळे आई व वडील त्याच्यावर रागवत असत. तो एकुलता मुलगा असल्याने त्याला प्लॉटही घेऊन दिला. मात्र, तो काहीही काम न करता फिरत रहायचा. त्याने आई-वडिलांना भीती वाटावी म्हणून यापूर्वी 2-3 वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.