Thu, Aug 22, 2019 04:07होमपेज › Aurangabad › शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविणार

शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविणार

Published On: Feb 10 2018 1:27AM | Last Updated: Feb 10 2018 1:10AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या इशार्‍यानंतर अखेर मनपा प्रशासनाने शुक्रवारी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामावर शिक्कामोर्तब केले. दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशीच सकाळी या कामाचा शुभारंभ करण्यात येईल, तसेच त्यासाठी इतर विभागांकडील परवानग्या मिळवण्यासाठी येणारी आव्हाने एकत्रितपणे पेलू, असे आश्‍वासनही महापौरांसह पदाधिकार्‍यांनी शिवजयंती महोत्सव समितीला दिले. या निर्णयानंतर मनपाच्या प्रांगणात फटाके फोडून निर्णयाचे स्वागत समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याबाबत मनपाने दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, मनपाला ते शक्य नसेल तर दोन दिवसांत त्याचा लेखी खुलासा करावा, जिल्हा शिवजयंती उत्सव समिती स्वखर्चाने पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम करण्यास तयार आहे, असे जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी समितीच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क करून चर्चेसाठी मनपात येण्याचे आमंत्रण दिले होते. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, अभिजित देशमुख, राजेंद्र दाते पाटील, अप्पासाहेब कुडेकर, रमेश केरे, गजानन पाटील, रमेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मनपात दाखल झाले. शुक्रवारी सकाळपासूनच मनपात सर्वसाधारण सभा सुरू असल्याने, महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, आयुक्त डी. एम. मुगळीकर, नगरसेवक प्रमोद राठोड, राज वानखेडे, राजू शिंदे, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी त्यांच्याशी स्थायी समितीच्या सभागृहात चर्चा केली. 

चर्चेअंती या कामाला गती देण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपासह पोलिस, एमएसआरडीसी, जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी मिळवणे व इतर कामे करण्यासाठी ही समिती पाठपुरावा करेल. 19 रोजी या कामाचा शुभारंभ करण्याचे महापौर घोडेले यांनी जाहीर केले. नुसते भूमिपूजन करून वेळ मारून नेऊ नका, कामही वेळेत पूर्ण करा, असा टोलाही विनोद पाटील यांनी लगावला.

नाही तर पाच वाजता आम्ही भूमिपूजन करू... 
महापौर म्हणाले, जानेवारी 2013 मध्ये आणि सप्टेंबर 2016 मध्ये या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतरही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याबाबत कार्यवाही झाली नाही. आमच्याकडून उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या कामासाठी निधीची कमतरता नाही. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल. टाईमबॉण्ड प्रोग्राम ठरवण्यात येईल. आपल्याला हे काम करायचे आहे, आज त्याचा श्रीगणेशा झाला असे समजा..., असे सांगत महापौरांनी समितीच्या पदाधिकार्‍यांना चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. त्यावर विनोद पाटील यांनी मनपाने आम्हाला फक्त एनओसी द्यावी. दोनदा ठराव होऊनही काही झाले नाही. आज तुम्ही आम्हाला तारीख द्या, नाही तर एनओसी द्या, अशी मागणी केली. 19 फेब्रुवारी रोजी 4 वाजेपर्यंत आम्ही मनपाकडून कामाचा शुभारंभ होण्याची वाट पाहू, नसता, पाच वाजता आम्ही भूमिपूजन करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले. या भूमिकेनंतर महापौरांनी आयुक्त व शहर अभियंत्यांसोबत पुन्हा दहा मिनिटे एकांतात चर्चा केल्यानंतर 19 रोजी या कामाचा शुभारंभ करण्याचे जाहीर केले.