Wed, Jul 17, 2019 08:00होमपेज › Aurangabad › ‘तिच्या’सोबत पाहताच पत्नीने पतीला झोडपले

‘तिच्या’सोबत पाहताच पत्नीने पतीला झोडपले

Published On: Jan 23 2018 10:46AM | Last Updated: Jan 23 2018 10:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

तरुणीसोबत हॉटेलात गप्पा मारत बसलेल्या पतीला पत्नीने चांगलाच हिसका दाखविला. ती चक्क दामिनी पथकाला घेऊन हॉटेलात धडकली अन् पुढे अख्ख्या हॉटेलचा ताबाच तिने घेतला. एसी हॉटेलात तरुणीसोबत गप्पांमध्ये दंग असलेल्या पतीला अक्षरशः घाम फुटला. सिडको बसस्थानक परिसरातील एका नामांकित हॉटेलात सोमवारी दुपारी 2 वाजता हा प्रकार घडला. त्याची कर्मचार्‍यासह परिसरात जोरदार चर्चा सुरू होती.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप (नाव बदललेले आहे) हा जयभवानीनगर भागात राहतो. तो लेबर कॉन्ट्रॅक्टर असून पुंडलिकनगर रोडवर त्याचे ऑफिस आहे. विविध कंपन्यांना कामगार पुरविण्याचे तो काम करतो. काही दिवसांपूर्वी एक तरुणी त्याच्याकडे नोकरी शोधण्यासाठी आली. त्याने तिला दुसर्‍या कंपनीत कामाला पाठविण्याऐवजी स्वतः च्याच कार्यालयात ठेवून घेतले. यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. ते बाहेर फिरायला जाऊ लागले.

सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास संदीप आणि ती तरुणी सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलात गेले. तेथे फॅमिली झोनमध्ये ते बसले. त्यांच्या गप्पा रंगात आलेल्या असताना ही माहिती पत्नीला मिळाली. तिने चक्क दामिनी पथकाला फोनवर ही माहिती देऊन महिला पोलिसांसह थेट हॉटेल गाठले. तरुणीसोबत गप्पा मारण्यात दंग असलेल्या संदीपची समोर पत्नी पाहिल्यावर अक्षरशः बोबडी वळाली. आपले बिंग फुटल्याचे लक्षात आले; परंतु तोपर्यंत त्याच्या पत्नीने तरुणीसह संदीपला चांगलेच फैलावर घेतले. संदीपला तर त्याच्या पत्नीने धुतल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

तरुणीचा तक्रार देण्यास नकार

दामिनी पथकाने तिघांनाही एमआयडीसी सिडको ठाण्यात नेले. तेथे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तरुणीची काही तक्रार आहे का? हे विचारले. त्यावर तरुणीने संदीप (नाव बदललेले आहे) हा विवाहित असल्याचे माहीत नव्हते, असे सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास नकार दिला. दरम्यान, घर पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पती-पत्नीच्या वादाबाबत त्यांनी तिकडेच तक्रार करावी, असे पोलिस निरीक्षक माळाळे यांनी या दाम्पत्यास सांगितले.