Wed, Jun 26, 2019 12:11होमपेज › Aurangabad › औरंगाबाद शहरात जागोजागी मृत्यूचे सापळे

औरंगाबाद शहरात जागोजागी मृत्यूचे सापळे

Published On: Jun 21 2018 1:28AM | Last Updated: Jun 21 2018 1:03AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जयभवानीनगरात उघड्या नाल्यात पडून भगवान निवृत्ती मोरे (50, रा. जयभवानीनगर) यांना मंगळवारी आपला जीव गमवावा लागला. रस्त्यावर असलेल्या नाल्या, नाले, ड्रेनेज यावर संरक्षक जाळ्या, ढापे बसविण्यात मनपाकडून सातत्याने होणार्‍या हलगर्जीपणामुळेच मोरे यांचा बळी गेला. विशेष म्हणजे मोरे यांच्या प्रमाणेच दरवर्षी अशाच पद्धतीने पावसाळ्यात कुणा तरी निष्पापाला जीव गमवावा लागतो. मात्र, मनपा प्रशासनाला याचे काहीच सोईरसुतक नाही. म्हणूनच की आज आजही जयभवानीनर प्रमाणाचे मनपाच्या कृपेने शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी असे ‘मृत्यूचे सापळे’ दिसून येत आहेत. पावसाळ्यात या सापळ्यात आणखी काही जणांचे जीव गेले तर आर्श्‍चय वाटू नये...

स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असलेल्या औरंगाबाद असे मृत्यूचे सापळे काही नवीन नाहीत. दरवर्षी मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली मनपा प्रशासन लाखो रुपयांची उधळपट्टी करते; परंतु यातील बहुतांश कामे ही कागदोपत्रीच होतात, हे वास्तव आहे. शहरातील प्रत्येक भागात ठिकठिकाणी ड्रेनेजचे तुटलेले ढापे, उघड्या नाल्या, संरक्षक जाळी, भिंती नसलेले नाले आहेत. पावसाळ्यात कागदोपत्री नालेसफाईमुळे सर्वच नाले, नाल्या जाम होतात अन् मग रस्त्यावरून पाणी वाहू लागते. पाण्यामुळे ढापा, संरक्षक जाळी आहे की नाही हे लक्षात येत नाही आणि त्यात पडून निष्पापाचा जीव जातो. 

आतापर्यंत अनेकांचे अशा पद्धतीने जीव गेलेले आहेत. मात्र, मनपा प्रशासनाने यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी कोणतेही उपाययोजना केलेल्या नाहीत.  घटना घडल्यानंतर चौकशी तसेच दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना तोकडी मदत देण्याचे नेहमीचे सोपस्कार मनपाचे कारभारी तसेच अधिकारी पार पाडतात बस!. मंगळवारी रात्री जयभवानीनगरात घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा मनपाच्या या भोंगळ कारभाराचा आणि हलगर्जीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

तुटलेले ढापे सर्वाधिक धोकादायक

औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी नाले उघडे असून काही ठिकाणी नाल्यांवर बनविलेले ढापे तुटलेले आहेत. पावसाच्या पाण्यात हे तुटलेले ढापे सर्वाधिक धोकादायक ठरत आहेत. वाहत्या पाण्यात हे तुटलेले ढापे दिसत नसल्याने त्यात पडून मोठ्या प्रमाणात दरवर्षी अपघात होतात. स्मशानमारुती मंदिरापासून कैलासनगरकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर एक ढापा अनेक महिन्यांपासून तुटलेला आहे. यात दररोज एका तरी वाहनधारकांचा अपघात होत आहे. अनेक वेळा ट्रकसारखी मोठी वाहनेही या ढाप्यात अडकली आहेत. मात्र, मनपा अधिकार्‍यांचे याकडे कधी लक्ष गेले नाही. चिश्तिया चौक ते बजरंग चौकदरम्यान असलेल्या रस्त्यावर काही ठिकाणी नाल्या उघड्या असून यावर ढापे नाहीत. बजरंग चौक ते आझाद चौक दरम्यान संग्रामनगर परिसरात नाली तुंबलेली असून त्यावरील ढापे तुटलेले आहेत. टीव्ही सेंटर ते डी मार्ट रोडवरील उघडी नाली घातक आहे.  एम-2, एन-9 परिसरातील रस्त्यावर नाल्यावरील पुलावर कसलाही कठडा नसल्याने धोकादायक असून पावसाळ्यात यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सावरकर चौक ते वरद गणेश मंदिर रस्त्यावरही ढापे तुटलेले आहे.

साफसफाईअभावी नाल्यांचा श्‍वास गुदमरलेलाच...

पावसाळ्याच्या अगोदरच पालिकेने शहरातील सर्व नाल्यांची सफाई करणे आवश्यक आहे. मात्र, महानगरपालिकेने विशिष्ट भागातील सोडली तर नाल्यांची साफसफाई बासनात गुंडाळून ठेवली आहे. पावसाळ्यात हे तुंबलेले नाले घातक ठरत असून अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरते. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि थर्माकोल तसेच इतर कचरा साचलेला आहे. कचरा कोंडीच्या काळात तर अनेक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याने नाल्यांची कोंडी झाली आहे. पावसाळ्यात आता हीच कोंडी घातक ठरण्यास सुरुवात झाली आहे.