होमपेज › Aurangabad › पोलिसांविरोधात आयुक्‍तांकडे दाद

पोलिसांविरोधात आयुक्‍तांकडे दाद

Published On: Mar 13 2018 1:47AM | Last Updated: Mar 13 2018 1:41AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

माझ्या घरासमोर कचरा आणून टाकायचा प्रयत्न केला असता, तर मीही या लोकांप्रमाणे विरोध केला असता. विरोध करणार्‍यांना अमानुषपणे मारणे हा कोणता न्याय आहे. पोलिस आहेत म्हणून आम्ही काहीही करू शकतो... इतका गुंडाराज कसा काय असू शकतो. ज्या डीसीपींनी लाठीहल्याचा आदेश दिला, त्याच आता चौकशी करत आहेत, यांना कसा काय न्याय मिळेल. घरातील साहित्यांची नासधूस केली. गावात दहशतीचे वातावरण आहे, असे आमदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्‍तांच्या निदर्शनास आणून दिले. सोमवारी दुपारी मिटमिट्यातील शेकडो महिला, नागरिक विभागीय आयुक्‍तांकडे दाद मागण्यासाठी आले होते. विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत, पोलिस आयुक्‍तांशी चर्चा केली. अखेर दोन तासांनंतर नागरिकांना दिलासादायक आश्‍वासने पोलिस उपायुक्‍तांकडून मिळाल्यानंतर नागरिक बाहेर पडले.

बुधवारी (दि. 7) मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरून नागरिक आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला होता. दगडफेक, कचरा गाड्यांची जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला करत दिसेल त्याला बेदम झोडपले. सायंकाळी पोलिसांनी गावात घुसून एकच धुडगूस घातला. समोर दिसेल त्याला बदडून काढले, घरांवर दगडफेक केली. घरात घुसून महिला, मुलांना झोडपले. घरातील साहित्यांची नासधूस केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. घराच्या भिंतीवरील सीसीटीव्ही पोलिसांनी काठी मारून तोडून टाकले. गुरुवारी हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसी अत्याचाराने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असून, दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी होत आहे, तर पाच दिवसांपासून पुरुषमंडळी घराबाहेर जीव लपवत फिरत आहेत.

मारहाण केल्यानंतर पोलिस कर्मचारी घरातीलच पाणी पिऊन, फ्रीजमधील आइस्क्रीम खात बाहेर पडले. घरातील महिला, लहान मुलांनाही सोडले नाही. पोलिसांच्या मारहाणीत अंगावरील वळ काही नागरिकांनी अधिकार्‍यांना दाखवत, अमानुष मारहाणीचा पुरावा दिला. पठाण ढाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची रेकॉर्डिंग असलेले मेमरी कार्डही पोलिसांनी काढून नेले. सर्व मुलांना सोडा नाहीतर आम्हा सर्वांना अटक करा, अशी मागणी नागरिकांनी केली.