Tue, May 21, 2019 12:49होमपेज › Aurangabad › गार्बेज वॉकचे ठिकठिकाणी कचर्‍याने स्वागत

गार्बेज वॉकचे ठिकठिकाणी कचर्‍याने स्वागत

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 18 2018 12:52AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मनपा प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ शहरवासीयांनी काढलेल्या गार्बेज वॉकचे ठिकठिकाणी कचर्‍याने स्वागत झाले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी वारंवार सूचना, आदेश देऊनही मनपा प्रशासनाने गार्बेज वॉक मार्गाची स्वच्छता करण्यात कुचराई केल्याचे दिसले.

‘गार्बेज वॉक’च्या पूर्वसंध्येलाच महापौर नंदकुमार घोडेले यांनी पैठणगेट ते महापालिका हा गार्बेज वॉकचा मार्ग मंगळवारी पहाटेच कचरामुक्‍त करून चकाचक करावा, असे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पैठणगेट ते महापालिका या मार्गाची स्वच्छता करण्यात आली नव्हती. पैठणगेट ते रंगार गल्लीपर्यंतच्या रस्त्यावरून कचरा गायब दिसला, मात्र त्यापुढे मनपा प्रशासन आणि स्वच्छता कर्मचार्‍यांनी कामात कुचराई केल्याने मागील अनेक दिवसांपासून रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढीग गार्बेज वॉक दरम्यानही कायम होते. कचराकोंडीच्या विरोधात नागरिकांनी काढलेल्या गार्बेज वॉकचे रस्त्यावर जागोजागी पडलेल्या कचर्‍यानेच स्वागत केले. सिटी चौक ते महापालिका मुख्यालय दरम्यान चार ते पाच ठिकाणी रस्त्यावरच पडलेला कचरा बघून अनेकांनी संतप व्यक्‍त केला. आमदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयापुढे आणि महापालिकेपासून हाकेच्या अंतरावरही कचरा पडून होता. अपवाद जुना बाजार नई बस्तीसमोर एकाठिकाणी स्वच्छता कर्मचारी कचरा उचलताना दिसला. 

Tags : Ahmadnagar, Welcome,  garbage, waste, trunk