Sat, Apr 20, 2019 08:33होमपेज › Aurangabad › मनीषाचे जल्लोषात स्वागत

मनीषाचे जल्लोषात स्वागत

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:08AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठवाड्यातील पहिली महिला एव्हरेस्ट वीरांगणा मनीषा वाघमारेचे गिरिप्रेमींसह औरंगाबादकरांनी जल्लोषात स्वागत केले. दहा वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता उत्तर अमेरिकेतील माउंट डेनाली हे शिखर सर करण्याचे लक्ष्य असल्याचे मनीषाने सांगितले. 

इंडियन कॅडेट फोर्सतर्फे एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारेचे चिकलठाणा विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. आई सुमन वाघमारे, वडील जयकृष्ण वाघमारे, भाऊ विजय वाघमारे, एमजीएमचे विश्‍वस्त अंकुशराव कदम, मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या सचिव अ‍ॅड. कल्पलता भारस्वाडकर-पाटील, प्राचार्या वसुधा पुरोहित, इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे, जगदीश खैरनार, प्रभुलाल पटेल, पंकज भारसाखळे आदींनी मनीषाचे स्वागत केले. त्यानंतर तिची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. 

मनीषा वाघमारे म्हणाली, ‘एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवले तेव्हा अस्विमरणीय आनंद झाला. माझ्या आयुष्यातील हा सर्वोच्च क्षण होता. या क्षणाची मी गेल्या दहा वर्षांपासून वाट पाहात होते. गेल्या वर्षी एव्हरेस्ट शिखर अवघे 170 मीटर अंतरावर राहिले असताना खराब हवामानामुळे परतावे लागले होते. त्यावेळी अतिशय दु:ख झाले होते. त्यामुळे यंदा नव्या जोमाने मोहीम फत्ते करण्यासाठी गेले होते. गतवर्षीचा अनुभव यंदा कामी आला. गेल्यावेळेसच्या चुका टाळल्याने यंदा एव्हरेस्ट शिखर सर करण्यात यश आले.’

एव्हरेस्ट शिखरावर चढाई करताना अंतिम टप्प्यात ऑक्सिजन सिलिंडरचे रेग्युलेटर खराब झाले होते. शेर्पाच्या मदतीने ही बिकट स्थिती हाताळत मी मिशन साकारले. एव्हरेस्ट शिखर मिशन 56 दिवसांचे झाले. त्यापैकी 40 दिवस हे रोटेशनमध्ये गेले. 51व्या दिवशी मी एव्हरेस्ट शिखर सर केले. आठ हजार मीटर उंचीवर ऑक्सिजनचा वापर करावाच लागतो. ‘डेथ झोन’ म्हणून हा भाग ओळखला जातो. चढाई करताना बर्फावर पडणार्‍या सूर्यकिरणांचा माझ्या डोळ्यांना त्रास झाला. एवढा अपवाद वगळता ही मोहीम यशस्वी झाली याचा मला अपार आनंद आहे, असे मनीषाने सांगितले.