होमपेज › Aurangabad › लग्न घटिका समीप येताच वधूपित्याने सोडला प्राण

लग्न घटिका समीप येताच वधूपित्याने सोडला प्राण

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 12:23AMपैठण/पाचोड : प्रतिनिधी 

सकाळपासून लग्‍नाची धामधूम सुरू झाली. करवल्यांनी हसत-खेळत अंगाला हळद लावली. मुंडावळ्या, बाशिंग बांधून विवाहासाठी वधू-वरांना सजवले. ऐन शुभमंगल सावधान म्हणण्याची घटका समीप आली. वर्‍हाडी मंडळी मंडपात आली. अक्षतांचे वाटप करण्यात आले अन् वधूच्या पित्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची मंडपातच प्राणज्योत मालवली. ही हृदयद्रावक घटना पैठण शहरापासून 12 कि.मी . अंतरावर असलेल्या राहटगाव (ता. पैठण) येथे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. पांडुरंग वीर असे मृत पित्याचे नाव आहे. 

 राहटगाव येथील पांडुरंग पाराजी वीर (वय 45) यांची द्वितीय कन्या प्रियांका हिचा सोमवारी विवाह होता. यासाठी अवघे गाव जमा झाले होते. वर्‍हाडी मंडळी आली. पण... परमेश्‍वरच्या मनात काही वेगळेच होते. मंडपातच अचानकपणे वधूच्या पित्याला हृदयविकाराचा झटका आला अन् त्यांचा मंडपातच मृत्यू झाला. काही क्षणातच लग्नमंडपात शांतता पसरून दुःखाचे वातावरण निर्माण झाले. सरपंच बबन मिसाळ, उपसरपंच कैलास फासाटे आदींनी वीर यांना तातडीने खासगी वाहनाने औरंगाबादला हलविले. वधू वगळता इतरांना याची कल्पना होती. यामुळे मोठ्या जड अंतःकरणाने अक्षता टाकण्यात आल्या. मात्र ही दुःखद बातमी वधू प्रियांकाला कळालीच. वडील आपल्याला सासरच्या घरी वाटे लावतील असे स्वप्न पाहात असलेल्या नवरी मुलीलाच आपल्या वडिलांनाच वाटे लावण्याचा दुर्दैवी प्रसंगी ओढवला.