Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Aurangabad › अकरा बंधारे तोडल्यानंतरच जलवाहतूक

अकरा बंधारे तोडल्यानंतरच जलवाहतूक

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 29 2018 1:38AMऔरंगाबाद ः संजय देशपांडे

गोदावरी नदीतून जलवाहतूक सुरू करणे तूर्त तरी अशक्यप्राय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पैठण ते नांदेडपर्यंत असणारे अकरा उच्चपातळी बंधारे या वाहतुकीसाठी तोडावे लागतील. गोदावरीत किमान तीन मीटरची पाणीपातळी राखण्याचे आव्हान त्यासाठी पेलावे लागणार आहे. गोदावरीतून पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घालण्याचे कामदेखील करावे लागेल. 

गोदावरी नदीत जलवाहतूक सुरू करणे, हा आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चार ऑगस्टरोजी औरंगाबादेत केली होती. जलमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, येत्या डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल. जलमार्गामुळे नाशिकपासून नांदेडपर्यंतचा प्रवास बोटीने करणे शक्य होईल. नांदेडचा कापूस आंध्र प्रदेशच्या बाजारपेठेत जाण्याची सुविधा यामुळे उपलब्ध होईल, असे गडकरी यांनी सांगितले होते.

गडकरी यांच्या या ‘ड्रीम प्रकल्पात’ अनेक अडचणी असल्याचे तज्ज्ञांशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले. जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले की, जलवाहतूक सुरू करण्यासाठी नदीत किमान तीन मीटर पाणीपातळी कायम राखणे गरजेचे आहे. त्याशिवाय जहाजे चालू शकणार नाहीत. गोदावरी नदीत अशी पातळी कायम राखणे कठीण आहे. नदीत पाणी सोडल्यास शेतकरी उपसा करतील. त्यामुळे पाण्याचे राखण करण्यासाठी नदीच्या दोन्ही तीरांवर कायम पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागेल. त्यामुळे जलवाहतूक तूर्त तरी अशक्य वाटते. 

पैठण ते नांदेडपर्यंत तब्बल 11 उच्चपातळी बंधारे आहेत. जलवाहतूक सुरू करायची झाल्यास हे बंधारे तोडावे लागतील किंवा बंधारा ते बंधारा, अशी टप्पा वाहतूक सुरू करावी लागेल. त्यामुळे जलवाहतूक प्रकल्प अशक्यप्राय वाटतो, असे मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ संचालक शंकरराव नागरे यांनी सांगितले. गोदावरी नदी एकेकाळी बारमाही पाण्याने भरलेली होती. या नदीच्या 30 उपनद्या असून, त्यातील 18 उपनद्या मराठवाड्यात, तर 12 विदर्भात येतात. उपनद्यांवर अनेक ठिकाणी धरणे, बंधारे बांधण्यात आल्याने त्यांचे पाणी गोदावरीत येण्यास अडसर निर्माण होतो. या परिस्थितीत गोदावरी कायम भरलेली राहू शकत नसल्याने जलवाहतूक सुरू करणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले.