Mon, May 20, 2019 11:27होमपेज › Aurangabad › नाशिक ते नांदेडपर्यंत गोदेतून जलवाहतूक : गडकरींची घोषणा

नाशिक ते नांदेडपर्यंत गोदेतून जलवाहतूक : गडकरींची घोषणा

Published On: Aug 05 2018 8:43AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गोदावरी जलमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात असून, येत्या डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल. जलमार्गामुळे नाशिकपासून नांदेडपर्यंत बोटीने प्रवास करणे शक्य होईल. नांदेडचा कापूस गोदावरीतून थेट आंध्र प्रदेशच्या बाजारपेठेत जाण्याची सुविधा यामुळे उपलब्ध होईल, अशी घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि.4) येथे केली.

औरंगाबादच्या दौर्‍यावर आलेल्या गडकरी यांनी रस्ते व जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले आदी या वेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, ‘जलमार्गाने केली जाणारी वाहतूक अत्यंत स्वस्त असल्याने गोदावरी जलमार्ग पूर्ण करणे, हा माझा स्वप्नवत प्रकल्प आहे. रस्ते मार्गाने होणार्‍या वाहतुकीस प्रति कि.मी. 10 रुपयांचा खर्च होतो. रेल्वे वाहतुकीस प्रति कि.मी. 6 रुपये लागतात. या उलट जलमार्ग वाहतुकीस प्रति कि.मी. एक रुपया इतका अत्यल्प खर्च येतो.’ नाशिक ते आंध्र प्रदेशया जलमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. ‘डीपीआर’ तयार झाल्यानंतर डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल. त्यामुळे नाशिकपासून थेट नांदेडपर्यंत बोटीने प्रवास करणे शक्य होईल. या जलमार्गामुळे व्यापारास प्रोत्साहन मिळेल.

नांदेड जिल्ह्यात उत्पादित होणार्‍या कापसाला आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील बाजारपेठ मिळेल. त्यामुळे शेतकर्‍यांचाही फायदा होईल, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्‍त केला.

तक्रारीवरून कामे थांबवू नका

रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी काही लोकप्रतिनिधी करतात. तक्रारीनंतर लगेच काम थांबविले जाते. त्यानंतर हा लोकप्रतिनिधी काम सुरू करण्यास हरकत नसल्याचे पत्र देतो. राज्यात
काही ठिकाणी असे प्रकार घडले आहेत, असे स्पष्ट करून लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आल्यास प्रथम चौकशी करा. तक्रारीत तथ्य असल्यास कामे थांबवा, मात्र तथ्य नसल्यास दखल घेऊ नका, असा सल्ला गडकरी यांनी अधिकार्‍यांना दिला.

नदीजोड प्रकल्पांतर्गत दमणगंगा आणि पिंजार प्रकल्पातील पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्यात येणार आहे. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत या प्रकल्पाचे काम सुरू झालेले दिसून येईल. दमणगंगेचे पाणी मराठवाड्यात आणल्याने जायकवाडी धरणासह गोदावरी नदीत कायम पाणी राहील. मराठवाड्याचा पाण्याचा अनुशेष यामुळे येत्या तीन वर्षांत संपुष्टात येईल,
असेही त्यांनी स्पष्ट केले.

25 हजार कोटींचे कर्ज : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास स्टेट बँक ऑफ इंडियाने तब्बल 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. कर्जाचा धनादेश आम्हाला मिळाला असल्याने रस्त्यांच्या कामांसाठी निधी कमी पडणार नाही.
- नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळण मंत्री.