Wed, Apr 24, 2019 22:09होमपेज › Aurangabad › शहर बनले कचर्‍याची राजधानी

शहर बनले कचर्‍याची राजधानी

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 04 2018 12:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचर्‍याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सद्यःस्थितीत शहरात आणि शहरालगतच्या प्रक्रिया प्रकल्पांच्या नियोजित जागांवर तब्बल पंधरा हजार टन कचरा साचला आहे. दुसरीकडे कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे पालिकेने सध्या साचलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र निविदा काढली आहे. 

मनपाचा नारेगाव येथील कचरा डेपो 16 फेब्रुवारीपासून कायमचा बंद झाला. तेव्हापासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी राज्य सरकारने मनपाच्या 91 कोटी रुपयांच्या कचरा व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी दिली आहे. तसेच हा संपूर्ण निधी शासनाच्या वतीने खर्च केला जाणार आहे. या आराखड्यानुसार शहरात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेची निविदा प्रक्रिया सुरू आहे, परंतु ही निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि त्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. दुसरीकडे शहरात रोज साडेचार टन कचरा निघत असून तो शहरात विविध ठिकाणी साठविला जात आहे. 

सद्यःस्थितीत हर्सूल, चिकलठाणा, कांचनवाडी, पडेगाव या नियोजित प्रक्रिया प्रकल्पांच्या जागांवर तसेच शहरातही सेंट्रल नाका, रमानगर, सिल्लेखाना, औरंगपुरा आदी ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. त्यावर पावसाचे पाणी पडल्याने हा कचरा जागेवर सडत असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. सद्यःस्थितीत शहरात सुमारे पंधरा हजार टन कचरा साठलेला आहे. त्यामुळे आता मनपाने तात्पुरत्या स्वरूपात या साचलेल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र निविदा काढली आहे. त्यानुसार 9 जुलै रोजी इच्छुक ठेकेदारांना सेंट्रल नाका येथे डेमोसाठी बोलाविण्यात आले आहे. डेमो पाहून त्यातील काही कंपन्यांना हे काम त्वरित देण्यात येणार आहे.