Thu, May 28, 2020 12:33होमपेज › Aurangabad › पाण्याच्या शोधातील हरणावर कुत्र्यांचा हल्‍ला

पाण्याच्या शोधातील हरणावर कुत्र्यांचा हल्‍ला

Published On: Jun 13 2019 5:46PM | Last Updated: Jun 13 2019 5:36PM
सिल्लोड : प्रतिनिधी 

सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक शिवारातील खटकाळी मधील गट नंबर १९७ मध्ये असलेल्या शेतवस्तीवर पाण्याच्या शोधात भटकत एक हरीण आले होते. यावेळी दोन मोकाट कुत्र्यांनी या हरणावर हल्‍ला केला. यावेळी स्‍थानिक शेतकर्‍यांनी त्‍याला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले, आणि त्‍याला जखमी अवस्‍थेत सुनील काकडे यांच्या वखारीवर आणण्यात आले.

हरणाच्या शरिराचे कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे हरिण गंभीर जखमी झाले. त्यातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्ञाव होत होता. उपस्थित शेतकऱ्यांनी वांगी गावचे पोलिस पाटील चंद्रकांत जाधव यांना याबाबत फोनवर माहिती दिली. यानंतर चंद्रकांत जाधव व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नानासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी हरणाची अवस्था पाहून चंद्रकांत जाधव यांनी भराडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बी जी चव्हाण यांना माहीती दिली. डॉ. बी जी चव्हाण यांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी त्वरित येऊन जखमी हरणावर औषधोपचार केले. 

हरिण गंभीर जखमी असल्यामुळे पोलिस पाटील चंद्रकांत जाधव व नानासाहेब गायकवाड यांनी वनपाल ए. ए. राठोड यांना माहिती कळविली. यावेळी राठोड यांनी वनरक्षक टी.व्ही.मनगटे यांना घटनास्थळी पाठविले परंतु त्यापूर्वीच हरणाचा मृत्यु झाला होता. यादरम्यान वनरक्षक टी व्ही मनगटे यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन सदरिल मृत हरणाचा पंचनामा करून त्याच्यावर त्याच ठिकाणी  शेतक-यांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले.

यावेळी वनरक्षक टी.व्ही.मनगटे, विलास नरवडे, पोलिस पाटील चंद्रकांत जाधव सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गायकवाड, विष्णू साळवे, आशोक काकडे, सुनिल काकडे आदी शेतकरी उपस्थित होते