होमपेज › Aurangabad › हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता

व्हिडिओकॉन दिवाळखोरीत?

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 12 2018 1:46AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद एमआयडीसीच्या आधारस्तंभापैकी एक असलेल्या व्हिडिओकॉन समूहाने अचानक चित्तेगाव येथील सर्वांत मोठे युनिट 7 ते 18 जानेवारी या बारा दिवसांच्या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली. गेल्या काही महिन्यांपासून अशाच पद्धतीने कामगारांना अधून-मधून सक्‍तीच्या सुट्या देण्यात येत होत्या; परंतु पहिल्यांदाच तब्बल बारा दिवसांची सक्‍तीची सुटी दिल्याने उद्योग जगत हादरून गेले आहे. व्हिडिओकॉन समूह दिवाळखोरीत तर सापडला नाही ना?, या शंकेने कामगार आणि या समूहावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्हेंडर कंपन्या हवालदिल झाल्या आहेत. 

औरंगाबाद हे मूळ असलेल्या व्हिडिओकॉन समूहाने टीव्ही, फ्रीज, एसी, मोबाइलसह विविध घरगुती उपकरणांच्या उत्पादनामुळे जगभरात नावलौकिक मिळविलेला आहे. या समूहाच्या घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा जगभरातील बाजारपेठेत वेगळाच दबदबा होता. विशेष म्हणजे व्हिडिओकॉन समूह हा औरंगाबाद एमआयडीसीचा कणाच समजला जायचा. औरंगाबादच्या उद्योग वाढीत या समूहाचा मोठा हातभार आहे. आज या समूहाचे पैठण रोडवरील चित्तेगाव आणि बीड रोडवरील चित्तेगाव येथे दोन मोठे युनिट आहेत. यात सुमारे साडेसहा हजार कामगार काम करतात.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या उत्पादनात अचानक मोठी घट झालेली आहे. त्यामुळे येथील कामगारांना सहा महिन्यांपासून सतत अधून-मधून चार-पाच दिवसांची सक्‍तीची सुटी देण्यात येत होती. वर्ष अखेरीस कंपनीने अचानक सर्व कामगारांना 28 डिसेंबर ते 5 जानेवारी अशी नऊ दिवसांची दीर्घ सुटी दिली. सुटी देताना नववर्ष असल्याने उत्पादन बंद ठेवण्यात येत असल्याचे कारण सांगण्यात आले होते. ती सुटी संपत नाही तोच 7 जानेवारी रोजी कंपनीने पुन्हा 7 ते 18 जानेवारी अशी दीर्घ सक्‍तीची सुटी कामगारांना दिली. विशेष म्हणजे सुटी देताना कंपनीने काहीही कारण दिलेले नाही. औरंगाबादेतील सर्व युनिटमध्ये सक्‍तीच्या सुटीची ही नोटीस लावण्यात आली आहे. त्यामुळे कामगार हवालदिल झाले आहेत. 

कंपनीला मोठा तोटा

व्हिडिओकॉन समूह सध्या चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या समूहाकडे बँकांचे मोठे कर्ज थकले आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही अहवालात समूहाला तब्बल 1 हजार 33 कोटी 69 लाख रुपयांचा तोटा झाल्याचे वृत्त आहे. मुंबई शेअर बाजाराला कंपनीने तशी माहिती दिलेली आहे. कंपनीचा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळेच कंपनी व्यवस्थापनाने काही दिवस कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच बँकेचे व्हिडिओकॉनकडे सुमारे 30 हजार कोटींचे कर्ज थकले असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद उद्योगजगताला मोठा फटका

व्हिडिओकॉन समूहावर औरंगाबादेतील वाळूज, शेंद्रा, चित्तेगाव येथील हजारो छोटे-मोठे उद्योग अवलंबून आहेत. या व्हेंडर कंपन्यांना गेल्या वर्षभरापासून व्हिडिओकॉनकडून पुरेशा ऑर्डर मिळत नव्हत्या, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे व्हिडिओकॉनमधील साडेसहा हजार कामगारांबरोबरच या छोट्या-मोठ्या व्हेंडर कंपन्यांमधील हजारो कामगारांवरही संकटाचे ढग दाटून आले आहेत. 

गाड्या अडकल्या, कामगारांचे हाल

या संदर्भात व्हिडिओकॉन वाहतूक युनियनचे अध्यक्ष खंदारे यांनी सांगितलेे की, गेल्या काही दिवसांपासून कंपनी आर्थिक अडचणीत असल्याचे दिसते. कामगारांना सतत सक्‍तीच्या सुट्या देण्यात येत आहेत. आमच्या कंपनीचे दोनशे कंटेनर माल घेऊन बाहेर पडलेले आहेत. मात्र, आता या गाड्या देशातील विविध ठिकाणी अडकल्या आहेत. अनेक गाड्यांचे इंधन संपले आहे. चालक, क्‍लिनरकडे खाण्यापिण्यासाठी पैसेही राहिलेले नाहीत. शिवाय व्यवस्थापनाच्या कुणाशीही संपर्क होत नसल्यामुळे त्यांना पैसेही मिळेनासे झाले आहेत. परिणामी, या गाड्या आणि कर्मचारी अडकून पडले आहेत. कंपनीची बाजू ऐकून घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी सातत्याने व्यवस्थापनाशी संपर्क साधत आहेत; परंतु कुणीही याबाबत स्पष्टीकरण देण्यास तयार नाही, हे विशेष.