होमपेज › Aurangabad › विद्यापीठातील चार कोटींची उचल अधिवेशनात गाजणार

विद्यापीठातील चार कोटींची उचल अधिवेशनात गाजणार

Published On: Jul 06 2018 1:30AM | Last Updated: Jul 06 2018 1:14AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (बामू) कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी परीक्षेच्या कामासाठी स्वतंत्र खात्यावर चार कोटी रुपये वळविल्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत. 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झाले आहे. अधिवेशनात बामूशी संबंधित काही मुद्दे पटलावर आहेत. सचिवालयाने त्याबाबत बामू प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. वार्षिक परीक्षेचे काम केलेल्या कंत्राटदाराचे बिल अदा करण्यासाठी कुलगुरूंनी स्वतंत्र संयुक्‍त खाते उघडून चार कोटी रुपये त्यावर वळविले होते. याबाबत एका सदस्याने प्रश्‍न विचारला आहे.

याशिवाय परीक्षा विभागाकडून झालेली प्रश्‍नपत्रिका आणि इतर प्रकारच्या साहित्य खरेदीबाबत सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी प्रश्‍न विचारला आहे. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. अशोक पवार यांनी कथितरीत्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याच्या आरोपाचा मुद्दाही चर्चिला जाणार आहे. याबाबत स्थानिक आमदारांनी प्रश्‍न विचारल्याचे समजते. याशिवाय संतपीठाचा मुद्दाही पटलावर येणार आहे. एका सदस्याने संतपीठ कुठे सुरू करावे ? ते सुरू करणे सयुक्तिक आहे किंवा काय ? अभ्यासक्रम कसा असावा, अशी विचारणा केली आहे. संतपीठाचा विषय विद्यापीठाच्या अखत्यारीतील असल्यामुळे सचिवालयाने याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.