Thu, Apr 25, 2019 03:57होमपेज › Aurangabad › कुलगुरू चोपडे यांचे ‘वेट अँड वॉच’

कुलगुरू चोपडे यांचे ‘वेट अँड वॉच’

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 03 2018 1:39AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) कुलगुरूपदी निवड झाल्याचे वृत्त राष्ट्रीय स्तरावरील दैनिकांनी दिले असले तरी खुद्द चोपडे यांना याबाबतचे अधिकृत पत्र अद्याप प्राप्‍त झालेले नाही. त्यामुळे त्यांनी नियुक्‍तीच्या वृत्तावर शुक्रवारी सावध भूमिका घेतली. सकाळपासून त्यांना अभिनंदनाचे दूरध्वनी सुरू झाले. काही तर पुष्पगुच्छ घेऊन आले होते. मात्र, चोपडेंनी ते स्वीकारण्यास नकार दिला. बीएचयू हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वांत मोठे विद्यापीठ आहे. 

 नियुक्‍तीच्या वार्तेबाबत पत्रकारांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांची भेट घेतली असता त्यांनीही आपल्याला ही माहिती इंटरनेटवरून कळाल्याचे समजले. दुपारी साडेबारा वाजता मी बीएचयूचे प्रभारी कुलगुरू डॉ. नीरज त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनीही बीएचयूला असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही किंवा मला तसे पत्र मिळत नाही तोपर्यंत आपण यावर प्रतिक्रिया व्यक्‍त करू शकणार नाही, असे ते म्हणाले.

बीएचयूच्या कुलगुरूपदी     कोणाचीही नियुक्‍ती होवो. ही नियुक्‍ती म्हणजे मोठा गौरव आहे, असे डॉ. चोपडे म्हणाले. या विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन नंतर देशाचे राष्ट्रपती झाले. या विद्यापीठाला थोर परंपरा आहे. त्या परंपरेचा पाईक होण्याची संधी मिळणे भाग्याचे आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, नियुक्‍तीचे पत्र मिळाले किंवा नाही याबाबत खातरजमा करण्यासाठी रात्री कुलगुरूंना दूरध्वनी केला. तथापि, त्यांचा दूरध्वनी बंद होता. 
लोकशाहीचा आदर ः अनुभव, ज्येष्ठता यामुळे तुम्ही खरे तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या चेअरमन होण्याच्या शर्यतीत होतात. पण, तेथे तुमची वर्णी लावण्यात आली नाही. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून बीएचयूसाठी निवड केली गेली काय या प्रश्‍नावर डॉ. चोपडे यांनी  आपल्याला मिळालेली भूमिका स्वीकारली पाहिजे या मताचा मी आहे, असे उत्तर दिले. अमूक भूमिका मिळायला हवी होती त्याऐवजी जी मिळाली ती मी अधिक चांगल्या प्रकारे कशी पार पाडू शकेन हे महत्त्वाचे आहे. मुख्य म्हणजे मी लोकशाहीचा प्रचंड आदर करतो. संयम महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले. 

बीएचयूही अंधारात? 

दरम्यान, बीएचयूशी संपर्क साधण्यात आला असता तेथील सूत्रांनीही डॉ. चोपडे यांची नियुक्‍ती झाल्याचे कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. यह खबर गलत है, असे या सूत्राने सांगितले. 

नियुक्‍ती प्रक्रियेत आहे 

बीएचयूसाठी नव्या कुलगुरूंची नियुक्‍ती करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयातील सूत्रांनी शुक्रवारी स्पष्ट केल्याचे वृत्त एका ऑनलाइन पोर्टलने दिले आहे.