Tue, Apr 23, 2019 19:50होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : एमआयडीसीतील हल्‍ला पूर्वनियोजित?

औरंगाबाद : एमआयडीसीतील हल्‍ला पूर्वनियोजित?

Published On: Aug 12 2018 8:11AM | Last Updated: Aug 12 2018 8:11AMऔरंगाबाद : विनोद काकडे

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्यांवर करण्यात आलेला हल्ला, जाळपोळ आणि लुटालूट हा पूर्वनियोजित कटाचाच भाग असल्याची बाब हळूहळू पोलिस तपासात समोर येत आहे. जमाव रस्त्यावर आंदोलन करीत असताना एका बुलेटस्वाराने या जमावाला चक्‍क मेगा फोनद्वारे (छोटा लाऊड स्पीकर) भडकाविले. ‘इकडे या, ही कंपनी फोडा, ही गाडी जाळा’ असे सांगत ‘तो’ हिंसक कृत्यासाठी प्रेरित करीत होता, अशी माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे जमावाला भडकविण्यासाठी या बुलेटस्वाराबरोबरच चारचाकींमध्येही काही जण येथे असेच फिरत होते. जमाव भडकविणार्‍या या मास्टरमाइंडचा आता पोलिसांनी शोध सुरू केला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

9 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यात औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात चौकाचौकांत रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करण्यात आले. वाळूज एमआयडीसीतही असेच आंदोलन सुरू होते. दुपारी दोन वाजेपर्यंत एमआयडीसीतही शांततेत हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर मात्र, अचानक एक मोठा जमाव औद्योगिक वसाहतीत घुसला आणि त्यांनी अक्षरश: तेथे धुडगूस घातला. एकापाठोपाठ या जमावाने गुडईअर, तुषार इंडस्ट्रिज, एफडीसी, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, मार्गनाईट, युरोलाईफ, कोलगेट, जे. के. केमिकल्स, मायलॉन, नहार इंजिनिअरिंग, कॉम्प्टन अ‍ॅण्ड ग्रीव्हज्, एनआरबी बेअरिंग, इंडूरन्स, स्टरलाईट, सिमेन्स, व्हेरॉक, कॅनपॅक, वोक्हार्ट, अशा सुमारे 70 ते 80 कंपन्यांवर हल्ले केले. येथे मोठ्या प्रमाणात तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. या कंपन्यांच्या आवारात उभे असलेले ट्रक, कंटेनरही त्यांनी पेटवून दिले. आंदोलनादरम्यान झालेल्या या हल्ल्यात वाळूज एमआयडीसीचे शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे हल्ल्यामुळे औरंगाबादची उद्योग जगतात मोठी नाचक्‍की झाली आहे. उद्योजकांनी चक्‍क आम्ही येथून कंपन्या हलवू असा इशाराच दिला. ही घटना केवळ राज्यातच नाही तर देशभरात गाजत आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी ठाण्यात आतापर्यंत सात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 

शनिवारी आणखी 19 हल्लेखोर अटकेत

पोलिसांनी आता कंपन्यांमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच आरोपींना शोधून त्यांना अटक केली जात आहे. शुक्रवारी 17 जणांना सायंकाळपर्यंत पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी रात्री उशिरापर्यंत आणखी 19 जणांना अटक करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या हल्लेखोरांची संख्या 36 वर पोहोचली आहे, अशी माहिती वाळूज एमआयडीसीचे निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. धरपकड सुरूच असून आरोपींचा आकडा बराच वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

तपासासाठी अख्खी पोलिस यंत्रणा जुंपली

एमआयडीसीवरील हल्ल्याच्या तपासासाठी आता वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या मदतीला गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखेसह विशेष पथकाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनाही तैनात करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेणे, खबर्‍यामार्फत आरोपींची माहिती काढण्याचे काम या पथकांकडून सुरू आहे. ‘तो’ बुलेटस्वार आणि चारचाकींमध्ये असलेल्या ‘मास्टरमाइंड’चाही आता पोलिसांनी शोध सुरू केला असून त्यांचे काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आंदोलनाचे निमित्त साधले!

वाळूज औद्योगिक वसाहतीवर झालेला हा अभूतपूर्व हल्ला एका पूर्वनियोजित तयारीनिशी केलेल्या कटाचाच भाग असल्याचा संशय व्यक्‍त केला जात होता आणि पोलिसांच्या तपासात आता तो खरा ठरताना दिसू लागला आहे. पोलिसांच्या हाती असे काही सीसीटीव्ही, व्हिडिओ क्‍लिप लागल्या आहेत की त्यावरून या संशयाला बळ मिळत आहे. शिवाय अटकेतील काही आरोपींच्या चौकशीतही ही बाब समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा जमाव जेव्हा रस्त्यावर आंदोलन करीत होता, त्याचवेळी काही जण चारचाकी वाहने घेऊन तर एक जण बुलेटवर आला. या बुलेटस्वाराकडे चक्क मेगा फोन होता. छोट्या लाऊड स्पीकरवर त्याने ‘चला कंपन्यांकडे चला, त्या फोडू, जाळू, आपल्या बंदमध्येही कंपन्या सुरूच आहेत, तिकडे चला’ असे म्हणत जमावाला भडकाविले. जमाव भडकावूनच तो थांबला नाही तर जमावाला घेऊन तो एमआयडीसीत घुसला आणि त्यांच्यासोबत बुलेटवर जात ‘ही कंपनी फोडा, पेटवा हे वाहन’ असे तो म्हणत होता, विशेष म्हणजे त्याने स्वत: चेहरा लपविण्यासाठी हेल्मेट घातलेे होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. या जमावासोबतच ‘त्या’ चारचाकीही तेथे घुटमळत होत्या.

जमावात घुसविला जमाव?

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन करीत बसलेल्या जमावात या मास्टरमाइंडने आपली काही माणसे घुसविल्याचाही पोलिसांना संशय आहे. कारण या जमावात काही जण तोंडाला कपडे बांधून तयारीनिशी आले होते. ऐन तोडफोडीच्या वेळी तोंडाला फडके बांधणारी माणसे कंपन्यांमध्ये घुसली आणि त्यांनी दुसर्‍या जमावालाही भडकावित तोडफोड, जाळपोळ केली, असाही पोलिसांचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले.