Wed, Aug 21, 2019 19:47होमपेज › Aurangabad › ‘नांमका’त सोडणार अप्पर वैतरणेचे पाणी

‘नांमका’त सोडणार अप्पर वैतरणेचे पाणी

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 27 2018 12:14AM वैजापूर : प्रतिनिधी

नांदूर-मधमेश्वर कालव्यासाठी अप्पर वैतरणेचे दोन टीएमसी पाणी देण्याबरोबरच नांमकाच्या अपूर्ण चारींचे काम पूर्ण करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी 
घेतला आहे. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे तालुक्यातील भाजप नेते व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील सिंचनप्रश्नासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नांदूर -मधमेश्वर कालव्यात 43 हजार हेक्टर क्षेत्राची सिंचन क्षमता आहे, परंतु अपूर्ण चारीमुळे केवळ 11 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यामुळे याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडून अहवाल मागवून चारीच्या कामासाठी तत्वतः निधी देण्यास मान्यता दिली आहे. नांदूर-मधमेश्वर पिकअप वेअरमधील जलसाठ्यावर नाशिक शहरासाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली. अप्पर वैतरणेचे पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी वळवून नांदूर-मधमेश्वर कालव्याव्दारे देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून जे अतिरिक्त पाणी सोडण्यात येते, त्यासाठी चारी क्रमांक 52 चे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी 43 किलोमीटर अंतर असलेल्या चारीच्या पहिल्या टप्प्यात 18 किलोमीटर अंतरावरापर्यंतचे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. वैजापूर शहरासाठी नांदूर-मधमेश्वर कालव्याव्दारे भूमिगत जलवाहिन्या टाकून नारंगी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

13 कोटी रुपयांचा प्रस्ताव : उर्वरित अस्तरीकरणाच्या कामासाठी 13 कोटी रुपये देण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आला आहे. याशिवाय तालुक्यातील शनिदेवगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रावर उच्च पातळीच्या बंधार्‍याच्या कामाबाबातही निर्णय या बैठकीत महाजन यांनी घेतला. या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप, कल्याण दांगोडे, भाजप नेते मोहन आहेर, सुरेश राऊत, डॉ. बाबासाहेब डांगे, दिलीप बनकर आदी उपस्थित होते.


शिवना कालव्याचे होणार काम

चांदेश्वरी येथील नदीवर उच्च पातळीच्या बंधार्‍याचे काम केल्यास परिसरातील 20 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे संबंधित कामाबाबात अहवालही मागविण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील शिवना-टाकळी प्रकल्पातून येणार्‍या कालव्याचे काम पूर्ण झाल्यास वैजापूर तालुक्यातील 40 गावांना सिंचनाचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे 30 जूनपर्यंत तालुक्यातील बोरदहेगावपर्यंत काम पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले.

Tags : Aurangabad, Vairtaines, water