Mon, Aug 19, 2019 01:18होमपेज › Aurangabad › वैजापूर : ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वच्छतागृच नाही

वैजापूर : ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वच्छतागृच नाही

Published On: Dec 18 2017 2:28AM | Last Updated: Dec 17 2017 11:59PM

बुकमार्क करा

वैजापूर : विजय गायकवाड

अक्षयकुमार व भूमी पेडणेकर यांचा टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटातून स्वच्छतागृहाचे महत्व पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे. गावामध्ये स्वच्छतागृह नसेल तर विशेषतः महिलांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत मार्मिक पध्दतीने यात भाष्य करण्यात आले. अशीच काहीशी अवस्था वैजापूर शहरात झाल्याचे बघायला मिळते. शहराची लोकसंख्या 42 हजारांपेक्षा जास्त असतानाही या लोकसंख्येसाठी पुरुषांसाठी केवळ तीनच सार्वजनिक मुतार्‍या आहेत, मात्र महिलांसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर एकही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे आम्ही जायचे कोठे, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.  

सन 2011 च्या जनगणनेनुसार वैजापूर शहराची लोकसंख्या 42 हजार आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील नागरी वसाहती वाढवून उद्योग व व्यवसायही झपाट्याने वाढले आहेत. शहराची लोकसंख्या निश्चित वाढली आहे. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांसह पुरुषांची मोठ्या प्रमाणावर शहरात रेलचेल असते. विशेषतः सोमवारी आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. शहरातील नागरी वसाहती उच्चभ्रू झाल्यात. सर्वच प्रमुख रस्त्यांवर नागरीकरण वाढवून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. उद्योग व व्यवसायातही शहर मागे नाही. शहरातर्गंत असलेले रस्तेही चकाचक करण्यात आले आहे.

नगरपालिका प्रशासनाने शहरालगत स्व. शंकरराव चव्हाण जलतरण तलावासह सुशोभित उद्यान, अग्निशमन यंत्रणा, नवीन पाणीपुरवठा योजना आदी विविध विकास कामे केली आहेत, परंतु शहरात मुबलक प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने काही प्रमाणात मान शरमेने खाली जाते. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जिथे पुरुषांसाठीच मुबलक प्रमाणात स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत कल्पना न केलेलीच बरी. 42 हजार लोकसंख्येसाठी पुरुषांसाठी 15 तर महिलांसाठी 19  स्वच्छतागृह शहरातील विविध भागांमध्ये बांधण्यात आले आहे. ही बाब स्तुत्य व खरी असली तरी. शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या पुरुषांच्या मुतार्‍यांची संख्या केवळ तीनच आहे. नगरपालिकेच्या आवारातील मुतारीसह जिल्हा परिषद प्रशाला परिसर व हुतात्मा जगन्नाथ भालेराव परिसरात अशा दोन फायबर मुतार्‍या उभ्या करण्यात आल्या आहेत, परंतु खेदाची बाब म्हणजे महिलांसाठी प्रमुख रस्ते अथवा महत्वाच्या ठिकाणी एकही स्वच्छतागृह नाही.

ग्रामीण भागातून येणार्‍या महिलांसाठी शहरात स्वच्छतागृहच नाहीत. त्यामुळे या महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होताना दिसून येते. ग्रामीण भागातील महिलांना एकतर पंचायत समिती अथवा व बसस्थानकातील स्वच्छतागृहांचा सहारा घेण्याशिवाय पर्याय नसतो. हे दोन्हीही स्वच्छतागृह शहराच्या दोन वेगवेगळ्या टोकांना आहेत. या दोन्हीही परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहर असून बाजारपेठ व शासकीय कार्यालये या मध्यवर्ती ठिकाणी वसलेली आहेत. त्यामुळे हे अंतर कापून ही स्वच्छतागृह गाठणे तारेवरची कसरत ठरते. ग्रामीण भागातील महिलांचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून असाच प्रलंबित आहेत. दरम्यान स्वच्छ भारत मिशनतर्गंत जिल्हा परिषद प्रशासनाने वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तालुकास्तरावर मॅरेथॉन बैठका होऊन शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. ऑगस्ट महिन्यांपासून उद्दीष्टपूर्तीसाठी ढोल पिटविले जात असतानाही पंचायत समिती प्रशासनाला शौचालयांची उद्दिष्ट गाठता येईना.

दुसरीकडे महिलांसाठी शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वानवा दिसून येत आहे. शहर व ग्रामीण भागातील ही विसंगती पाहता स्वच्छतागृह हा विषय निश्चितच सर्वांनाच मंथन करण्यास भाग पाडणारा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागातून येणार्‍या महिलांना लघुशंकेसाठी शहरात आडोसा शोधण्याची वेळ येऊन ठेपलेली असताना नगरपालिका प्रशासनाने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नगरपालिका क वर्गातून ब वर्गात गेली. परिणामी पालिकेचा निधीही वाढला. नगरसेवक पदाच्या 21 जागांवरून 23 जागा झाल्या, परंतु या तुलनेत विकासदर किती वाढला. हा मात्र संशोधनाचा विषय आहे. केवळ पुरस्कार प्राप्त होऊन अथवा महसूल वाढवून विकास साधला जाणार नाही. यासाठी शहरात पुरुष व महिलांसाठी आवश्यक सोयीसुविधांची उभारणी करणेही तितकेच आवश्यक आहे.  

तहसील कार्यालयातील महिलांचीही कुचंबना

तहसील कार्यालयाच्या बाबतही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वच्छतागृह नसल्याने त्यांना नगरपालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयातील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. कमी-जास्त हीच परिस्थिती शहरातील अन्य शासकीय कार्यालयांची आहे. जिथे शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांची कुचंबना सुरू असताना सामान्यांबाबत कितपत विचार होईल, याबाबत कल्पना न केलेलीच बरी. 

शहरातील प्रमुख ठिकाणी ग्रामीण भागातून येणार्‍या महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत. ही बाब सत्य आहे. महिलांची ही समस्या लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने शहरातील जुन्या बसस्थानकातील ठक्कर बाजार व लाडगाव रस्त्यावरील परिसरात असे दोन स्वच्छतागृह महिलांसाठी सुरू करण्याचा विचार आहे. - विठ्ठल डाके, मुख्याधिकारी, नगर परिषद वैजापूर.