होमपेज › Aurangabad › वैजापुरातील जि. प. प्रशाला मोजतेय शेवटची घटका

वैजापुरातील जि. प. प्रशाला मोजतेय शेवटची घटका

Published On: Dec 27 2017 1:39AM | Last Updated: Dec 27 2017 1:39AM

बुकमार्क करा
 वैजापूर : विजय गायकवाड

एकेकाळी नावलौकिक असलेल्या शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या (मुलांची) शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली असून ही शाळा शेवटची घटका मोजत आहे. सध्या इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत केवळ 61 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे इयत्ता पाचवीच्या वर्गात सध्या शून्य पटसंख्या असून इयत्ता सातवीमध्ये केवळ दोन विद्यार्थी आहेत. याशिवाय शालेय व्यवस्थापनाचे साफसफाईकडे दुर्लक्ष केल्याने ही शाळा चोहोबाजूंनी घाणीच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील स्टेशन रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेचा एकेकाळी नावलौकिक होता. शाळेचा केवळ नावलौकिकच नव्हे तर दर्जेदार व उत्तम गुणवत्ता म्हणून शाळेची ख्याती होती.

डॉक्टरसह इंजिनिअर, प्राध्यापक, उच्च पदस्थ अधिकारी,  व्यावसायिक, उद्योजक व प्रभावशाली राजकारणी या शाळेतूनच घडले. शैक्षणिकदृष्ट्या सबलीकरण करण्याची खाण म्हणून या शाळेची ओळख होती, परंतु सद्यस्थितीत ही शाळा मरणासन्न अवस्थेत असून शेवटचा श्वास मोजत आहे. सन 2001 ते 2002 या शैक्षणिक वर्षात याच प्रशालेत संपूर्ण वर्ग मिळून विद्यार्थ्यांची पटसंख्या ही 1049 इतकी होती. परंतु दिवसेंदिवस हा आकडा खाली येत गेला. केवळ गुणवत्ता व शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांनी या शाळेकडे पाठ फिरवली. त्यामुळे पटसंख्येत घसरण झाली. सन 2009 ते 2010 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची पटसंख्या  235 वर आली. जून 2016 ते एप्रिल 2017 या  शैक्षणिक वर्षात शाळेत पाच वर्ग मिळून विद्यार्थ्यांची शंभरीही गाठता आली नाही.

या वर्षामध्ये केवळ 95 विद्यार्थी तर जून 2017 ते एप्रिल 2018 या वर्षात ही पटसंख्या 61 विद्यार्थ्यांवर येऊन ठेपली आहे.  विशेष म्हणजे या शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गात सध्या एकही विद्यार्थी नसून पटसंख्या शून्य आहे. इयत्ता सहावी चार, सातवी दोन, आठवी दहा, नववी वीस व दहावीच्या वर्गात 25 असे एकूण 61 विद्यार्थी आहेत. दरम्यान शाळेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यामुळे शाळेला गळती तर लागलीच, परंतु शालेय व्यवस्थापन शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यासही सपशेल अपयशी ठरले आहे. देशात स्वच्छ भारत मोहिमेचा  नारा सुरू असतानाच दुसरीकडे शाळेतील गुरूजींनी स्वच्छतेला हरताळ फासला असल्याचे निदर्शनास येत आहे. संपूर्ण प्रशालेची इमारतच घाणीच्या विळख्यात सापडली आहे.

स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब असल्यामुळे या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरल्याने पालकांनी आपले पाल्य या शाळेत घालण्याऐवजी खाजगी शाळांना प्राधान्य देत आहे. केवळ गुणवत्ता घसरल्यामुळे शहरातील खासगी शाळांना सुगीचे दिवस आले आहेत. सरकारी शाळांना अधोगती येण्यासाठी विशेषतः गुरूजी मंडळीचा सिहांचा वाटा असल्याने शहरासह तालुक्यात खासगी शिक्षणसंस्थाचे पेव फुटून भरमसाठ शैक्षणिक शुल्क आकारून शिक्षणसम्राट लूट करून तुंबड्या भरून घेत आहेत.  त्यामुळे ज्यांची भरमसाठ शुल्क भरण्याची तयारी आहे. त्यांचेच शिक्षण आहे. असे खेदाने म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद प्रशाला शेवटचा श्वास घेत असताना जिल्हा परिषद प्रशासनाबरोबरच व्यवस्थापनानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. शाळेला चांगले दिवस आणण्यासाठी शासन दरबारी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळा आज प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे इमारतीला जीर्ण अवस्था प्राप्त झाली आहे.

दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांची रोडावलेली संख्या, जीर्ण झालेली इमारत व घाणीच्या साम्राज्यामुळे परिसराला प्राप्त झालेल्या बकाल अवस्थेमुळे ही शाळा नव्हे तर कचरा डेपो आहे की काय, असे वाटल्यावाचून राहत नाही. बॉक्स  शहरातील कन्या प्रशालेची (मुलींची) परिस्थितिही यापेक्षा वेगळी नाही. प्रशालेला  स्वतःच्या मालकीची इमारत नाही.  जागेच्या प्रतीक्षेत असणार्‍या कन्या प्रशालामध्ये सुद्धा काही वर्षापूर्वी हजाराच्या घरात असलेली विद्यार्थिनीची पटसंख्या ही   जून 2016 ते एप्रिल 2017 मध्ये 275 तर जून 2017 ते 2018 मध्ये 245 विद्यर्थिनींवर येऊन ठेपली  आहे.