Mon, Nov 19, 2018 15:28होमपेज › Aurangabad › अप्रशिक्षित चालकांच्या हातामध्ये ‘शिवशाही’

अप्रशिक्षित चालकांच्या हातामध्ये ‘शिवशाही’

Published On: Feb 20 2018 1:53AM | Last Updated: Feb 20 2018 1:28AMऔरंगाबाद ; प्रतिनिधी

नुकत्याच आलेल्या शिवशाही बस या संगणकीय सिस्टीमवर चालणार्‍या आहेत. या सिस्टीमची कुठलीच माहिती किंवा त्यांना बेसिक प्रशिक्षण न देताच या गाड्या साध्या बस चालवणार्‍या चालकांच्या हाती दिल्याने अपघातात वाढ होण्याची शक्यता आहे. शिवशाही बस येऊन एक महिना झाला, परंतु चालकांना प्रशिक्षण न दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. 

शिवशाही बस एसी असून यातील अनेक गोष्टी सेंसरच्या आधारे काम करतात. हे सर्व ऑपरेशन डॅश बोर्डवर येते, परंतु याबाबत साध्या बस चालवणार्‍या चालकांना काही माहिती नाही, तरीही त्यांना तोंडी माहिती देत ही गाडी चालवण्यास भाग पाडण्यात येत आहे. अनेक चालकांना एसी
 सिस्टीम,  सेंन्सर, रिटायर्डर सिस्टीम कशी व कोणत्या वेळी हाताळावी याचीच माहिती नाही. गाडी हातात दिल्यानंतर जाणकारांना विचारून तेच कशी तरी ही बस चालवण्याचा प्रयत्न करतात.

एस. टी. महामंडळाच्या या तुघलकी निर्णयामुळे शिवशाही बसचे अपघात वाढण्याची शक्यता आहे. महिनाभरापूर्वी शहरात दोन शिवशाही बसचे आगमन होताच चालकांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख स्वप्निल धनाड यांनी सांगितले होते, परंतु महिना उलटला तरी एकाही चालकांना याबाबत प्रशिक्षण दिले नाही. 

आजघडीला मुख्य बसस्थानकात शिवशाही बसची संख्या 14 वर आली आहे. प्रत्येक बसमध्ये दोन चालक काम करतात. असे 28 चालक शिवशाही बस रोज विविध मार्गावर चालवत आहेत, परंतु यातील एकाही चालकांना प्रशिक्षण दिले नाही. केवळ याला त्याला विचारून जोखीम पत्करून शिवशाही बस चालवत आहेत.