होमपेज › Aurangabad › विद्यापीठ बंद, परीक्षा रद्द

विद्यापीठ बंद, परीक्षा रद्द

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:56AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव घटनेचे शहरात पडसाद उमटल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस युक्‍तांकडून आलेल्या सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी विद्यापीठ पूर्णपणे बंद ठेवून आज होणार्‍या सर्व परीक्षा रद्द केल्या. 

 विद्यापीठ बंद करण्यासाठी काही संघटना, कार्यकर्त्यांकडून हिंसक घटना होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने विद्यापीठाला सजग केले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे बाहेरगावी असल्यामुळे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सकाळी विद्यापीठातील अधिकार्‍यांची बैठक घेतली. पोलिसांकडून कळालेली माहिती सांगून अनुचित घटना घडू नये म्हणून विद्यापीठ आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहेे, असे त्यांनी सांगितले. या निर्णयाची माहिती विद्यापीठातील सर्व विभागांना देण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय इमारतीसह सर्व विभाग बंद करण्यात आले. तत्पूर्वी काही विद्यार्थी नेत्यांनी वाचन कक्षातील विद्यार्थ्यांना कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी अरेरावी केल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली. यानंतर विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या या गटाने विद्यापीठातील विविध विभागांत जाऊन बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे विद्यापीठात आज अघोषित सुटीचे वातावरण होते. वाहनतळात एकही वाहन दिसत नव्हते. 

आज एम. ए. अर्थशास्त्र प्रथम वर्ष, एम. ए. लोकप्रशासन प्रथम वर्ष, एम. ए. इतिहास प्रथम वर्ष, एमबीए प्रथम वर्ष, तसेच एम.एस्सी. प्रथम वर्षाची ऑनलाइन आणि अभियांत्रिकी, एम.एस्सी.ची प्रात्यक्षिक परीक्षा होती. या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले. 

स्टुटंड्स फेडरेशन ऑफ इंडिया, सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनांनी विद्यापीठात निषेध सभा घेतली. भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर दगडफेक करण्याची घटना निषेधार्ह आहे. या प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या संघटनांनी केली. यावेळी सुनील राठोड, अमोल खरात, नितीन वाव्हळे, प्रकाश इंगळे, सत्यजित म्हस्के, लोकेश कांबळे, प्राजक्‍ता यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

कालचा पेपर रद्द झाल्यामुळे एमबीएचे परीक्षार्थी नाराज होते. आज सकाळी पेपर देण्यासाठी ते परीक्षा केंद्रावर आल्यानंतर त्यांना आजचा पेपर लांबणीवर टाकण्यात आल्याचे कळाले. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.