Mon, Mar 25, 2019 03:13
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › अनधिकृत बांधकाम; १५ जणांना नोटीस

अनधिकृत बांधकाम; १५ जणांना नोटीस

Published On: Dec 02 2017 2:05AM | Last Updated: Dec 02 2017 1:52AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

झालर क्षेत्रात सिडकोची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणार्‍या पंधरा जणांना प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. तसेच पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गुरुवारीही नाला बुजवून हडपण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाने महापालिका लगतच्या 28 गावांचा विकास करण्यासाठी झालर क्षेत्राची घोषणा केली होती. मात्र त्याला या गावांमधील नागरिक व शेतकर्‍यांनी घरे व शेती जात असल्याने कडाकडून विरोध केला होता. त्यामुळे हा विकास अनेक वर्षे रखडला होता. मात्र गेल्या महिन्यात शासनाने 28 गावांची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे आता या गावाच्या विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यानच्या काळात झालर क्षेत्र घोषित केल्यानंतर यामध्ये समावेश असलेल्या जवळपास सर्व गावांमध्ये अनेक बिल्डर व नागरिकांनी अनधिकृत बांधकाम करण्याचा सपाटा लावला होता.

अनेकांनी इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे सिडको प्रशासनाने पाहणी केल्यानंतर हे बांधकाम करणार्‍या अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. तसेच त्याचा मोबदला भरून अधिकृत करण्यास सांगितले होते. अनेकांनी रक्कम भरून आपले बांधकाम अधिकृत करून घेतले आहे. ही प्रक्रिया 2008 पासून सुरू असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र पंधरा जणांना सिडकोने नोटीस देऊन देखील ते नियमांप्रमाणे 32 दिवसांत आलेही नाही व नोटीसला उत्तर दिले नाही.

त्यामुळे पाच जणांविरुद्ध सिडकोने तक्रार दिल्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सात जणांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याशिवाय आणखी पाच गुन्हे दाखल करण्याबाबत अभिप्राय पाठविण्यात आलेला आहे. तर फत्तेपूर शिवारातील गट नं.24 व 26 मधील नाले बुजविणार्‍या विजय व गोपाल अग्रवाल दोन जणांविरुद्ध गुरुवारी दुपारी सिडको प्रशासनातर्फे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.