Mon, Jun 17, 2019 02:09होमपेज › Aurangabad › ‘आधी मारला डल्ला; आता करताय हल्ला’

‘आधी मारला डल्ला; आता करताय हल्ला’

Published On: Feb 05 2018 8:55AM | Last Updated: Feb 05 2018 8:55AMपैठण : प्रतिनिधी

मित्रपक्षाला आम्ही पंचवीस वर्षे जपले. आता मात्र सहन होत नाही. यापुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून आणि जिंकणारदेखील आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. आघाडीचे सरकार असताना सरकारी तिजोरीवर आधी डल्ला मारला आणि आता ते हल्लाबोल मोर्चा काढत आहेत, अशा शब्दांत त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चावर टीका केली.

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. 4) ठाकरे यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा. चंद्रकांत खैरे, सहकारमंत्री गुलाबराव पाटील, पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर, सेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर मान्यवर उपस्थित होते.

भगवा झेंडा हा आमचा अभिमान आहे. देशातील हिंदू मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून आतापर्यंत आम्ही भाजपसोबत होतो. आम्ही राज्य सांभाळतो, तुम्ही देश सांभाळा, असे धोरण आमच्यात ठरलेले होते. मात्र, देशही यांच्या हातात आणि आता ते राज्यातही घुसले आहेत. घरात घुसल्यानंतर काय करावे लागते, हे तुम्हाला माहीत आहे, असे म्हणत ठाकरेंनी पुन्हा आगामी निवडणुका स्वबळावर शिवसेना लढणार असल्याचा नारा दिला.