Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Aurangabad › दोन हजार टन सुका कचरा पडून

दोन हजार टन सुका कचरा पडून

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 12 2018 12:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचराकोंडीला बुधवारी 55 दिवस झाले. आतापर्यंत पालिकेने ठिकठिकाणी कंपोस्टिंग पीट उभारून ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे सुरू केले. असे असले तरी सुक्या कचर्‍याचा प्रश्‍न कायम आहे. पालिकेला त्यावर अजूनही उपाय सापडलेला नाही. म्हणून आता मनपाने शहरात ठिकठिकाणी, अगदी कार्यालयांमध्ये देखील गोण्यांमध्ये भरून सुका कचरा साठवून ठेवला आहे. सद्यःस्थितीत शहरात दोन हजार टनांहून अधिक सुका कचरा पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नारेगाव येथील कचरा डेपो बंद पडल्यापासून शहरात कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शहरात रोज सरासरी 450 टन कचरा निघतो. यात 60 ते 70 टक्के कचरा ओला असतो. मनपाने शहरात जागोजागी खड्डे करून त्यात ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती सुरू केली आहे. आणखीही काही ठिकाणी कंपोस्टिंग पीटचे काम सुरू आहे. दुसरीकडे सुका कचरा मात्र तसाच पडून राहत आहे. कचरा वेचकांच्या मदतीने सुका कचरा वेगळा करून त्यातील विक्रीयोग्य वस्तू बाहेर काढून त्या विकल्या जात आहेत.

तरीही रोज सरासरी 150 ते 200 टन कचरा उरत आहे. मनपाच्या घनकचरा विभागाने हा कचरा गोण्यांमध्ये भरून ठिकठिकाणी साठविणे सुरू केले आहे. सध्या शहरात तब्बल दोन हजार टन सुका कचरा अशा पद्धतीने साठविला गेला आहे. शहरातील सर्व नऊ झोनमध्ये त्या त्या भागात एकेक दोनदोन ठिकाणी हा कचरा साठविला गेला आहे. झोन 4 मध्ये वॉर्ड कार्यालयाच्याच इमारतीत, झोन 5 मध्ये गरवारिे स्टेडयमजवळील पडक्या इमारतीत याच पद्धतीने इतर ठिकाणीही खोल्यांमध्ये आणि मोकळ्या जागांमध्ये हा कचरा साठविण्यात आला आहे. 

Tags : Aurangabad, Two, thousand, tonnes,  dried, garbage, fall, road