Mon, May 20, 2019 11:31होमपेज › Aurangabad › दोन हजार लोकांना गंडविणारा गजाआड

दोन हजार लोकांना गंडविणारा गजाआड

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 12 2018 1:49AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना गंडा घालणार्‍या आरोपीला तीन वर्षांनंतर सिडको पोलिसांनी अटक केली. 24 तास प्रवास करून गुरुवारी (दि. 11) दीव-दमण येथे ही कारवाई करण्यात आली. मधुकर विठ्ठल सूर्यवंशी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 

याबाबत पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की,  2011 साली आरोपी मधुकर सूर्यवंशी, मिलिंद कसारे आणि प्रमोद विजयशंकर पाल (वय 32, रा. कांदीवली (पश्‍चिम), मुंबई) यांनी भीम फाउंंडेशन ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून तीन लाखांमध्ये पडेगाव भागात स्वस्तात घर देण्याची घरकूल योजनेची जाहिरातही करण्यात आली. त्याला भुलून शहरातील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी या संस्थेशी संपर्क साधला.

सेवानिवृत्त जमादार राम पुंडलिक उदावंत यांनी देखील या योजनेमध्ये एक लाख वीस हजार रुपये गुंतवले होते. कोट्यवधी रुपये या संस्थेने जमा केले होते, परंतु त्यानंतर बिल्डर पालसह तिघेही आरोपी पसार झाले होते. अखेरीस या प्रकरणी उदावंत यांनी सिडको पोलिस ठाण्यात तीन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला मात्र, सर्वजण पसार झाले होते. दरम्यान, 15 नोव्हेंबर 2017 रोजी पाल याला गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर सिडको ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. के. झुंजारे, कॉन्स्टेबल दुभळकर आणि दीक्षित यांना खबर्‍याकडून मधुकर सूर्यवंशी याची माहिती मिळाली. तो दीव-दमण येथे असल्याचे स्पष्ट झाल्यावर झुंजारे यांच्यासह पथकोन सूर्यवंशी याच्या मुसक्या आवळल्या. 

18 जिल्ह्यांत गुन्हे

बिल्डर प्रमोद पाल याने औरंगाबादसह 18 जिल्ह्यांतील नागरिकांना गंडा घातला आहे. त्याच्याविरुद्ध सर्व ठिकाणी गुन्हेही नोंद झालेे आहेत. औरंगाबादेतील 2 हजार नागरिकांना कोट्यवधीे रुपयांचा चुना लावणार्‍या पालला यापूर्वीच अटक झालेली आहे. आता मधुकर सूर्यवंशी जाळ्यात आला असून मिलिंद कसारे हा फरार आहे.