Fri, Mar 22, 2019 01:33
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › बसस्थानकात दोन अधिकार्‍यांत हाणामारी

बसस्थानकात दोन अधिकार्‍यांत हाणामारी

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 16 2018 2:10AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

चुकीच्या ठिकाणी ड्यूटी लावल्याने राग अनावर झालेल्या वाहतूक नियंत्रक पदावर असलेल्या अधिकारी व मुख्य बसस्थानक प्रमुख यांच्यात शाब्दिक चकमक झाली, व त्यानंतर शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांनीही मारहाण झाल्याची तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की मुख्य बसस्थानक प्रमुख कृष्णा मुंजाळ व वाहतूक नियंत्रक लक्ष्मण उणे यांच्यात सायंकाळी 5.30 च्या सुमारास ड्यूटी लावण्यावरून वाद झाला. चुकीच्या ठिकाणी ड्यूटी लावत असल्याचा आरोप करत उणे यांनी मुंजाळ यांच्याशी शाब्दिक वाद घातला. या वादाचे रूपांतर शेवटी मारहाणीत झाले. दोघांनीही एकमेकांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत मुंजाळ व उणेे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, दोन अधिकार्‍यांमध्ये झालेल्या मारहाणीमुळे कर्मचार्‍यांत एकच खळबळ उडाली आहे. जे कर्मचारी ड्यूटी वाटपामुळे नाराज आहेत, ते या निमित्ताने एकत्र येऊन वेगळीच रणनीती वापरत असल्याने अधिकार्‍यांत दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. 

तक्रार आल्यास चौकशी करू

दोन अधिकार्‍यांत वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. ते दोघेही पोलिसांकडे तक्रार करण्यास गेले आहेत. याबाबत माझ्याकडे कार्यालयीन तक्रार आल्यास त्या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.