होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : विद्यापीठात जादूच्या दोन विहिरी

औरंगाबाद : विद्यापीठात जादूच्या दोन विहिरी

Published On: May 18 2018 8:36AM | Last Updated: May 18 2018 8:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

टाकीतील किंवा हौदातील पाणी राखून ठेवता येते तसे विहिरीचे पाणी राखून ठेवता येते का ? इतर ठिकाणच्या विहिरींचे माहीत नाही. पण, विद्यापीठात पाणी राखून ठेवता येऊ शकणारी जादूची विहीर आहे. या विहिरीचे पाणी पिण्यासाठी चांगले असल्यामुळे उद्यान विभाग तिचे पाणी राखून ठेवून इनक्युबेशन सेंटरच्या बागेसाठी बाहेरून पाणी विकत घेत आहे. प्रतिटँकर दीड हजार रुपये या दराने गेल्या एक मे पासून या बागेची तहान भागवली जातेय. गंमत म्हणजे विद्यापीठामध्ये आणखी एक जादूची विहीर आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील या विहिरीचे पाणी वापरायलाच नाही तर झाडांनाही चालत नाही. कारण, काय तर म्हणे ते प्रदूषित आहे.

विद्यापीठाची झाडेही कमालीची हेल्थ कॉन्शस म्हटली पाहिजेत. त्यांना हे पाणी चालत नसेल तर ते उद्या आरओचे पाणी मागणार नाहीत कशावरून? पण, असल्या प्रश्‍नांना प्रशासनाच्या डिक्शनरीत स्थान नाही. या, प्रस्ताव सादर करा आणि बिले उचला असा प्रकार सुरू आहे. ना कोणाची रोकटोक, ना नियमांचा धाक. विद्यापीठाच्या एका उच्चस्तरीय अधिकार्‍याने अलीकडेच पत्रकारांशी बोलताना विद्यापीठात पाणी उपलब्ध आहे. मात्र, नियोजनाचा अभाव असल्याचे म्हटले होते. मग टँकर का सुरू आहेत? का ते केवळ कागदावरच धावत आहेत? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. विद्यापीठाच्या अनेक विभागांकडून आता टँकरची मागणी होऊ लागली आहे.

आरओवरील खर्च पाण्यात 

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ठिकठिकाणी आरओ प्लॉन्ट बसविले. त्यांची संख्या 12 हून अधिक आहे. यातील काही वापराअभावी बंद आहेत. आरओ प्लॉन्टच्या उभारणीवर 35 लाखांहून अधिक खर्च झाला आहे. असे असताना विद्यापीठातील बहुतांश विभाग आणि कक्षात सर्रास जारचे पाणी मागविण्यात येत आहे.
Tags : magic well, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad, BAMU