Tue, Mar 19, 2019 03:13



होमपेज › Aurangabad › चोरीच्या अडीच कोटींची आयपीएल सट्ट्यावर उधळपट्टी

चोरीच्या अडीच कोटींची आयपीएल सट्ट्यावर उधळपट्टी

Published On: Dec 02 2017 2:05AM | Last Updated: Dec 02 2017 2:05AM

बुकमार्क करा





औरंगाबाद ः प्रतिनिधी

दहा वर्षांपासून घरफोडीचा ‘उद्योग’ करणार्‍या एका अट्टल चोरट्याने चोरीतून मिळविलेले तब्बल 2 कोटी 60 लाख रुपये आयपीएल क्रिकेट सामन्यांत सट्ट्यात उडविल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. घरफोडीच्या आरोपात गुन्हे शाखेने जेरबंद केलेल्या या आरोपीने दिलेल्या या कबुलीमुळे पोलिसांचेही डोळे विस्फारले. त्याच्याकडून आणखी बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे.  

गुन्हे शाखा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात ‘खिडकी गँग’च्या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (35, रा. मोमिनपुरा, बीड), सय्यद सिराज सय्यद लियाकत (32, रा. बीड, ह.मु. एमआयडीसी अहमदनगर) आणि शेख बबलू शेख रहेमान (31, रा. एमआयडीसी अहमदनगर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. हे तिघेही अट्टल गुन्हेगार असून औरंगाबादेतील सहा घरे फोडल्यांची त्यांनी कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, आरोपी सराईत असले तरी ते अगदी पोपटासारखे बोलत आहेत. या तिघांपैकी सय्यद सिकंदर हा दहा वर्षांपासून घरफोडीचे गुन्हे करतोय.

तो बीड आणि अहमदनगरमध्ये वाँटेड असून जळगावमध्ये तो दीड वर्ष कारागृहात होता. दरम्यान, तत्पूर्वी त्याने चोरीच्या पैशांतून बीडमध्ये प्लॉट घेऊन ठेवले होते. गडगंज माया जमल्यावर त्याने चोर्‍या करणे थांबविल्या होत्या, परंतु जमवलेली सर्व माया त्याने आयपीएल सट्ट्यात घालविली. 2015 मध्ये त्याने प्लॉटची विक्री करून तब्बल दोन कोटी 60 लाख रुपये सट्ट्यावर उडविले. कोलकाता नाईट रायडर्स टीमवर सर्वाधिक सट्टा लावल्याचे त्याने कबूल केले. सट्ट्याचा रेट नियमित बदलायचा. कधी बॉलर्सकडून तर कधी बॅट्समनकडून सट्टा लावल्याचे तो सांगत आहे. यावरून बीडमध्ये सट्टा किती जोरात आहे हे उघड होते. 

गांजा विक्रीचा धंदा

आरोपी सय्यद सिकंदर याने गांजा विक्रीचाही धंदा केला आहे. कधी बीड, तर कधी अहमदनगरमध्ये राहणार्‍या या आरोपींच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून खिडकी उचकटविण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले असून एक कारही हस्तगत केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.