Sat, Mar 23, 2019 02:04होमपेज › Aurangabad › गोळ्या झाडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न

गोळ्या झाडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Published On: Apr 06 2018 2:19AM | Last Updated: Apr 06 2018 1:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पिस्टलचे दोन राउंड (9 एमएम) फायर करून स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना सेव्हन हिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (दि. 5) पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. नागरिक पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर दुपारी 12 वाजता हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, ज्या पिस्टलमधून गोळ्या झाडण्यात आल्या ते पोलिसाचेच असण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली. 6 जानेवारी रोजी मुख्यालयातील कॉन्स्टेबल अमित शिवानंद स्वामी (वय 27) यांचे पिस्टल गहाळ झाले होते. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सेव्हन हिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील पेट्रोल पंपाशेजारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) एटीएम केंद्र आहे. या एटीएममध्ये जवळपास 19 लाख रुपये रोकड होती. येथे सुरक्षा रक्षक नाही. हे एटीएम मशीन गुरुवारी पहाटे एकाने पिस्टलमधून गोळ्या झाडून फोडण्याचा प्रयत्न केला. ‘सीडीएम’ यंत्राच्या लॉकवर पहिला राउंड फायर करण्यात आला. तो लॉक तुटल्यानंतर आत आणखी एक लॉक होते. त्यावर दुसरा राउंड फायर केला. मात्र, ते लॉक तुटले नाही. त्यानंतर आरोपीने मशीन फोडण्याचा प्रयत्न सोडून देत घटनास्थळावरून पोबारा केला. 

फायर केलेले दोन राउंड जप्त :  एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक एल. ए. शिनगारे, उपनिरीक्षक सय्यद सिद्दीकी यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. पिस्टलमधून फायर करण्यात आलेले दोन राउंड (पुंगळ्या) पोलिसांनी जप्त केले. 

‘त्या’ पोलिस कॉन्स्टेबलचा शोध सुरू

6 जानेवारी रोजी मध्यरात्री खोली बदलताना न्यायमूर्तींचा अंगरक्षक कॉन्स्टेबल अमित स्वामी याचे पिस्टल आकाशवाणी चौकात गायब झाले होते. दहा जिवंत काडतुसे आणि पिस्टल गायब झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंद असून स्वामीला तत्कालीन आयुक्‍त यशस्वी यादव यांनी निलंबित केले होते. ते पिस्टल शोधण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरले. दरम्यान, आता अशाच पिस्टलमधून दोन राउंड फायर करून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा घडला. त्यानंतर गुन्हे शाखेने अमित स्वामीचा शोध सुरू केला आहे.