Wed, Nov 14, 2018 06:39होमपेज › Aurangabad › रानोमाळ भटकंती करून वनौषधींचा खजिना शोधला!

रानोमाळ भटकंती करून वनौषधींचा खजिना शोधला!

Published On: Mar 05 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 1:16AMऔरंगाबाद : गजेंद्र बिराजदार

मराठवाड्यात वनऔषधींचा खजिना आहे. असाध्य रोगांवर गुणकारी अशा अनेक दुर्मीळ वनस्पती आसपास आहेत. मात्र, त्यांची आपल्याला ओळख नाही. देवगिरी महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. रवी पाटील यांनी हा खजिना शोधण्यासाठी मराठवाड्यात रानोमाळ भटकंती केली. 

वैद्यांना सोबत घेऊन त्यांनी मोहा, चारोळी, बिबा, अर्जुन धावडा, बिहाडा, रिंगणी, काटेसावर, पिंपरी, मेडसिंग, खडसिंग, अजान, मारूख आणि पारोसा पिंपळ अशा अनेक औषधी वनस्पतींची माहिती संकलित केली. ही माहिती महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींच्या माहितीचे संकलन या डेटा बेसमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच या डेटाबेसचे प्रकाशन केले. 
भारतीय उपचार पद्धती मूलतः औषधी वनस्पतींवर आधारित आहे. आजीबाईंच्या बटव्यातील अनेक औषधी वनस्पतींचा आजही घराघरांत वापर होतो. जागतिकीकरणामुळे या औषधी वनस्पतींची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींची भौगोलिक नकाशानुसार उपलब्धता व त्यांचे औषधीय गुणधर्म याबाबतची माहिती  गोळा करण्यात आली. 
हा डेटाबेस औषधी वनस्पतीचा वापर करणारे, त्यावर संशोधन करणारे आणि अन्य इच्छुक यांनाही उपयुक्त ठरणार आहे. या डेटाबेसवरून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या औषधी वनस्पती हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.