Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › दंगल शांत; राजकारण पेटले

दंगल शांत; राजकारण पेटले

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जुन्या औरंगाबादेतील दंगल शांत होताच राजकारणाने पेट घेतला. शिवसेना आणि एमआयएमच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. ही दंगल पूर्वनियोजित कट होता. यात शिवसेनेला बदनाम केले जात असल्याचा आरोप खा. चंद्रकांत खैरे यांनी केला. तर, माझ्याकडे शिवसेना नेत्यांचे दंगलीत तोडफोड, जाळपोळ करताना व्हिडिओ आहेत. त्यावरून ही दंगल कोणी केली हे स्पष्ट होते. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आ. इम्तियाज जलील यांनी केली. दरम्यान, दोन्ही पक्षांनी पोलिसांना टार्गेट केले.  

शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र : खा. खैरे

दंगल घडली तेव्हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. सुभाष झांबड हे नेते कोठे गेले होते. अबू आझमीचे या शहरात काय काम आहे? असे सवाल उपस्थित करीत शहराच्या रक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध असून दंगलीचे आरोप करून शिवसेनेला नाहक बदनाम करण्यात येत आहे. उलट दंगेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खा. चंद्रकांत खैरे यांनी केली. त्यांनी सोमवारी सकाळी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांना निवेदन दिले. 

यावेळी खा. खैरे म्हणाले, गांधीनगर, मोतीकारंजा भागात दोन गट भिडल्याची माहिती मिळाल्यावर मी तेथे गेलो. वाद शांत करण्याचे काम सुरू असतानाच राजाबाजार, शहागंजमध्ये दंगल उसळल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मी पुन्हा तिकडे धाव घेतली. माझ्यासोबत प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे आदी पदाधिकारी होते. शिवसेना व राजाबाजारच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून या भागातील रहिवाशांचे रक्षण केले. आम्ही नवाबपुर्‍यात पोलिसांना संरक्षण दिले. नसता, दंगेखोर गुलमंडी, पैठणगेट, औरंगपुर्‍यापर्यंत जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून येणारे दगड, पेट्रोल बॉम्ब, रॉकेलचे ड्रम पोलिसांनी जप्त केले आहेत. यावरून ही दंगल पूर्वनियोजित कट होता, हे स्पष्ट होते. शिवसेनेमुळे शहर शांत आहे. मात्र, एमआयएमच्या एन्ट्रीमुळे अशांतता पसरली. त्यांच्यामुळेच शहरात हिंसाचाराच्या घटना वाढल्याचा थेट आरोप खा. खैरे यांनी केला. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर त्र्यंबक तुपे, कला ओझा, नगरसेवक सुनीता आऊलवार, ऋषीकेश खैरे, मोहन मेघावाले, विकास जैन यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

शहागंजमध्ये मीना बाजार नकोच : रमजान ईदनिमित्त शहागंजमध्ये भरणारा मीना बाजार नकोच, अशी भूमिका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली आहे. मीना बाजार शहागंजऐवजी आमखास मैदानावर भरविण्यात यावा, अशी मागणी करत शहागंजमध्ये मीना बाजार भरल्यास पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यताही शिष्टमंडळाने व्यक्‍त केली.