Wed, Apr 24, 2019 12:15होमपेज › Aurangabad › टोमॅटोचे ट्रक रस्त्यावर रिते; दर कोसळले

टोमॅटोचे ट्रक रस्त्यावर रिते; दर कोसळले

Published On: Jan 20 2018 2:04AM | Last Updated: Jan 20 2018 2:00AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कन्नड बाजार समितीत टोमॅटोचे 24 किलोंचे कॅरेट अवघ्या तेरा रुपयांना विकले आणि शेतकर्‍याचे हातपायच गळाले. वास्तविक औरंगाबाद आणि इतर बाजार समित्यांतील टोमॅटोची परिस्थिती काही वेगळी नाही. सरासरी चार ते पाच रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. परजिल्ह्यांत जाणारे ट्रकच्या ट्रक टोमॅटो रस्त्यानेच रिते केलेले पाहायला मिळतात. तोडणीचाही खर्च वसूल होत नसल्याने हताश शेतकर्‍यांनी अखेर उभ्या पिकांत जनावरे सोडली आहेत.

टोमॅटोचा पुन्हा ‘लाल चिखल’ करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. शहरी ग्राहकांच्या दृष्टीने स्वस्त झालेल्या टोमॅटोची बातमी समाधारकारक असली तरी, यामुळे उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. वर्षभरात अपवादात्मक दोन वेळेस झालेली टोमॅटोतील भाववाढ वगळता शेतकर्‍यांना हमालीच करावी लागली. सध्या जाधववाडी बाजार समितीमध्ये सर्वोत्कृष्ट माल असलेल्या 22 ते 24 किलोंचे कॅरेट अवघ्या 80 रुपयांना विकले जात आहे. साध्या टोमॅटोला तर ग्राहकही मिळेना. विशेष म्हणजे इतर जिल्ह्यांमध्येही वेगळी स्थिती नाही. त्यामुळे औरंगाबादेतून विक्रीसाठी बाहेर जाणार्‍या टोमॅटोचे ट्रकच्या ट्रक रस्त्यांच्या बाजूला रिकामे करण्यात आलेले आहेत. कन्नड रस्त्यावरील कारखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर असे टोमॅटोचे ढीग पाहायला मिळतात.

ढगाळ वातावरणाचा परिणाम
आधीच उत्पादन जास्त असल्याने 30 ते 35 रुपये किलोवर टोमॅटोचा भाव गेल्या काही महिन्यांपासून स्थिरावला होता. त्यातच आठवडाभरापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो अचानक जास्त प्रमाणात पिकले आणि बाजारात दाखल झाले. परिणामी आवक वाढल्याने टोमॅटोचे दर कोसळले आहेत.

काही दिवसांपासून टोमॅटोचे दर शेतकरी आणि ग्राहक, दोघांनाही परवडतील असे होते. आवक वाढल्याने आठवडाभरापासून भाव कोसळले आहेत. बाहेर जाणारे टोमॅटो शेतकर्‍यांनी रस्त्यावर फेकले, तर काही पिकांत जनावरे सोडत असल्याचे सांगतात.

- रियाज पठाण, विक्रेते