होमपेज › Aurangabad › तंबाखू, गुटख्यामुळे वाढले मुखरोग

तंबाखू, गुटख्यामुळे वाढले मुखरोग

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 18 2018 1:55AMऔरंगाबाद : प्रकाश जाधव

आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी या चार जिल्ह्यांतील तीस वर्षांवरील 4 लाख 46 हजार 302 नागरिकांचे सर्वेक्षण नुकतेच आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. यात 1 लाख 9 हजार 909 नागरिकांचे मुख आरोग्य अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. यातील 1 हजार 705 जणांना वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करण्यास सांगितल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.

आरोग्य विभागातर्फे डिसेंबर महिन्यात 30 वषार्र्ंवरील स्त्री-पुरुषांचे मुख आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. घरोघरी जाऊन चार जिल्ह्यांत 4 लाख 46 हजार 302 नागरिकांचे मुख आरोग्य तपासण्यात आले. यात 2 लाख 16 हजार 683 महिला तर 2 लाख 29 हजार 619 पुरुषांचा समावेश होता. चारही जिल्ह्यांतील नागरिक मुख आरोग्याबाबत जागृत नसल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. विभागात  1 लाख 9 हजार 909 जणांचे मुख अस्वच्छ आढळले. यात 11 हजार 685 जणांना सोडले तर सर्वाधिक 98 हजार 224  एवढी संख्या तंबाखू, गुटखा, सुपारी खाणारांचीच आहे. यावरून मुख अस्वच्छतेमागे धूम्रपान हेच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते. यात तोंड उघडता न येणार्‍या नागरिकांची संख्या 1676 तर पांढरा, लाल चट्टा 989 नागरिकांना आढळला. तोंडाची त्वचा जाड असणार्‍यांची संख्या 714 तर पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून बरा न होणारा  व्रण 111 जणांमध्ये आढळला आहे. एकूण 1705 जणांना पुढील तपासणीसाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय महाविद्यालयाकडे संदर्भीत केले आहे.